भगवानबाबांच्या जन्मभूमीत नवा इतिहास घडविणार : पंकजा मुंडे

By October 01, 2017 0
  • महंतांच्या केसालाही धक्का लागणार नाही

khedtimes.today |
सावरगाव : जनतेचा आग्रह अन्‌ गादीचा आदेश यात भगवान बाबांच्या जन्मभूमीचा मध्यबिंदू साधला. समाधी दर्शनासाठी आज गडावर जाता आले नाही याच्या मनाला प्रचंड वेदना होतात. कर्मभूमीने नाही तर आता जन्मभूमीने स्वीकारले. येथून नवा इतिहास घडविणार आहे. हा मेळावा पंकजाचा नसून गोरगरीब, वंचित, उपेक्षित व सामान्य बहुजनांचा आहे असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. महंतांसोबत आपले वाद नाहीत हे स्पष्ट करतानाच त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. मात्र, भगवान बाबांच्या विचार, आचारांना नख लावण्याचे काम त्यांच्याकडून होऊ नये एवढी अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.

महंत नामदेवशास्त्री यांनी केलेल्या विरोधामुळे यंदा प्रथमच संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे शनिवारी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला. याप्रसंगी मंत्री महादेव जानकर, प्रा. राम शिंदे, भगवान बाबा मंदिर ट्रस्टचे गहिनीनाथ सानप, माजी आ. केशव आंधळे, राधा सानप, बुवासाहेब खाडे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे,आ. ऍड. लक्ष्मण पवार, आ. प्रा. संगीता ठोंबरे, गयाबाई कऱ्हाड , जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, प्रवीण घुगे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांची उपस्थिती होती.

मेळाव्यातील अर्ध्या तासाच्या भाषणात पंकजा यांनी महंत व त्यांच्यातील वाद व त्यानंतर झालेल्या टीका- टिप्पणींना उत्तर दिले. संपूर्ण भाषणात त्यांचा रोख महंतांच्या दिशेने होता; परंतु गडाचा अन्‌ गादीचा अवमान कधी आपल्याकडून होणार नाही असे स्पष्ट करायलाही त्या विसरल्या नाहीत. त्या म्हणाल्या, सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या काना कोपजयातून लोक आले. या विराट गर्दीने मला संघर्ष करण्याची ताकद दिली आहे. कातड्याचे जोडे केले तरी उपकार फिटणार नाहीत अशी कृतज्ञता व्यक्त करुन त्या पुढे म्हणाल्या, संबंध महाराष्ट्राने आज लोकभावना पाहिली आहे. आच्या गर्दीने मेळावा जगमान्य झाला आहे. जनता पंकजासोबत आहे असे नाही तर पंकजा जनतेसोबत आहे हे यातून सिद्ध होते. माझ्या ओठातला शब्द जनतेच्या पोटातला असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. गडावर मेळावा घेण्यास महंतांनी विरोध केल्यानंतर गतवर्षी पायथ्याला मेळावा घेतला. मात्र, माझं काय चुकलं? हा प्रश्न मी स्वत:लाच विचारला. या प्रश्नाने मी व्यथित झाले.Pankaja 21

विजयादशमीनिमित्त मेळावा ही वैभवाची परंपरा आहे. भगवान बाबांची शपथ घेऊन सांगते मी सर्व महापुरुषांच्या जयंती- पुण्यतिथी कार्यक्रमांना आवर्जून जाते. मला दोन वर्षांत अनेकांनी विचारलं पंकजा हे नेमके काय झालेयं? मेळावा घ्यावा यासाठी मला भेटायला राज्यभरातून लोक आले. विमानतळावरही मला अडवलं. गादीचा आदेश मानायचा की जनतेचा आग्रह त्यामुळे मी भगवान बाबांच्या जन्मभूमीवर मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. उपस्थितांना उद्देशून पंकजा यांनी खरं सांगा हा मेळावा पंकजाचा आहे की तुमचा असा सवाल केला.

दसरा मेळावा गडावर घेण्यास महंत नामदेवशास्त्री यांनी केलेल्या विरोधानंतर अहमदनगर प्रशासनानेही परवानगी नाकारली होती. त्यामुळे मेळावा कोठे होणार? व पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. शनिवारी दुपारी बारा वाजता पंकजा मुंडे यांचे सावरगाव घाट येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. तत्पूर्वी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांची महारॅली गोपीनाथगडावरून सावरगाव घाटमध्ये पोहोचली. ग्रामस्थांनी पंकजा व प्रीतम यांचे उत्साहात स्वागत केले. घरोघर गुढ्या, अंगणात सुबक रांगोळी काढलेली होती. खचाखच गर्दीने सावरगाव घाट फुलून गेले होते.

  • लेकीचं सरकार, महंत सुरक्षित!

गोरगरीब, हातावर पोट असणारे व कोयता हातात घेऊन जगण्यासाठी लढणारे बांधव दरवर्षी मेळाव्यानिमित्त गडावर एकत्रित येत. त्यांना तेथे पैसे मिळत नव्हते तर उर्जा मिळत होती. आज गडावर काय चित्र आहे. याची एक क्‍लिप माझ्या मोबाइलवर आली. त्यात भक्तांपेक्षा पोलीस अधिक दिसताहेत. अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा दिमतीला आहे. सरकार कोणाचं आहे? लेकीचं सरकार आहे. महंतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. महंत शंभर वर्ऱ्षे जगावेत पण भगवान बाबांच्या आचार अन्‌ विचारांना धक्का लागू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  • … तर नेतृत्व सोडायला तयार

माझी ताकद वाढावी किंवा मला काही फायदा व्हावा यासाठी दसरा मेळावा नसल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ज्या दिवशी या गोरगरीब, वंचित, उपेक्षित समाजात उत्कृष्ठ नेतृत्व तयार होईल, त्या दिवशी मी माघार घेईन अन्‌ त्याला बोटाला धरुन पुढे नेईन. गोपीनाथ गडाच्या निर्मितीनंतर मी ट्रस्टतर्फे समाजातील 42 मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली आहेत. त्यापैकी अनेक जण मोठ्या हुद्द्यावर गेली आहेत.

  • भगवान बाबांची पाण्यावर तरंगणारी भव्य मूर्ती उभारणार

पंकजा मुंडे यांनी भाषणाच्या शेवटी भगवान बाबांच्या जन्मस्थळाचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. भगवान बाबांची पाण्यावर तरंगणारी ज्ञानेश्वरी वाचतानाची भव्य मूर्ती उभारणार आहे. ही मूर्ती पंचक्रोशीत कोणालाही दिसू शकेल अशी असणार आहे.

  • महंतांच्या त्या भाषणाने व्यथित

गोपीनाथगडाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देशभरातून लोक आले होते. यावेळी मंहतांनी आपल्या भाषणात आता भगवानगडाचा श्वास मोकळा झाला असे विधान केले. आम्ही गडाचा श्वास गुदमरून ठेवला होता का? असा सवाल करुन गडावर यापुढे मेळावा नाही या फतव्याने व्यथित झाल्याचे पंकजा यांनी सांगितले. महंत असे बोलू शकत नाहीत असे वाटले. मात्र, त्यांचा आदेश शिरसावंद्य मानला. त्यांच्या काणाला कोण लागले? याचे उत्तर काळच देईल असे त्या म्हणाल्या. डिसेंबर मध्ये माझे अन्‌ त्यांचे शेवटचे बोलणे झाले. त्यावेळी घडेलला प्रसंगही त्यांनी मेळाव्यात मांडला. त्या म्हणाल्या, गोपीनाथगडावरील भाषणानंतर असा आघात बरा नाही. बाप-लेक सांमजस्याने बोलू असे समजून मी शेवगावला प्रचारासाठी जाताना भगवानगडावर गेले. त्यावेळी महंत गादीवर बसले होते. यापूर्वी त्यांना मी कधी गादीवर बसलेले पाहिले नव्हते. मोनिका राजळे सोबत होत्या. आम्ही त्यांचे दर्शन घेतले. त्यांनी चहा मागविला; पण मंदिरात नेले नाही. मी त्यांना सांगितले, येण्यास उशीर झाला. रस्ता चुकल्याने गडाला वळसा घालून यावे लागले. त्यावर ते म्हणाले, तुम्ही निघा तुम्हाला उशीर होईल. त्यानंतर माझा अन्‌ त्यांचा संवाद झाला नाही.

  • पंकजा गहिवरल्या, जनसमुदाय स्तब्ध

पंकजा यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्ते घोषणा देत होते. घोषणा देऊ नका अशी विनंती पंकजा वारंवार करत होत्या; पण कार्यकर्ते अधून-मधून घोषणा देत होते. टाळ्या वाजवून त्यांच्या प्रत्येक वाक्‍याला दाद देत होते. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावेळी झालेल्या दगडफेकीनंतर अनेकजण भीती पोटी पळाले. मी दगड लागेल याची फिकीर केली नाही. मी वडील गमावले होते; पण त्याही दु:खी प्रसंगी माईक हातात घेऊन भगवान बाबांची शपथ… शांत रहा असे बजावले. मला माझ्यापेक्षा तुमची काळजी आहे. मी मुंबईला असेन, दिल्लीत असेन पण तुमच्या हाकेला धावून येते असे त्या भावूक होऊन म्हणाल्या. सोबतच गडावर दर्शनासाठी जाता आले नाही याच्या वेदना होतात असे सांगताना देखील त्या गहिवरल्या. त्यानंतर समोर बसलेला विराट जनसमूदाय देखील स्तब्ध झाला. पंकजांना गहिवरलेले पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचे चित्र दिसत होते.

Last modified on Sunday, 01 October 2017 14:56