खेड टाइम्स. टूडे ।

महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या  असामान्य जीवनांचा इतिहास— कारकीर्द आजपर्यत मराठी साहित्याने समर्थपणे चरित्रलेखनाच्या माध्यमातून शब्दबध्द केला आहे. परंतु या मातीत जन्मून याच मातीत आयुष्यभर वारकरी संप्रदायाची पेरणी करणारे ‘ह.भ.प. रावजीबुवा गिलबिले’ यांचे जीवनपट ‘मधुकर गिलबिले’ यांनी ‘शिल्पकार’ हा चरित्रग्रंथ लिहून एक शिवधनुष्य मोठ्या धाडसाने पेलला आहे. या ग्रंथाचे मुखपृष्ठ शिषर्कास साजेसे असे असून अर्पणपत्रिका ही अत्यंत बोलकी आहे ती अशी…

 ‘‘परिस्थितीने कागदावरची अक्षरे न शिकता;
 जगण्याच्या पाठशाळेत अनुभवांची अक्षरे गिरवत;
 आयुष्यभर काळ्या मातीत घाम गाळून,
 आम्हा मुलांच्या हाती पाटी—पुस्तक दिलं;
 या जगात ताठ मानेनं जगण्याचं सामर्थ्य दिलं,
त्या ‘आईस’ सादर समर्पित…’’

आपल्या वडिलांचे चरित्र आपल्या आईस समर्पित करताना लेखकाचा दोघांबद्दल असलेले आदरयुक्त प्रेम प्रकटपणे जाणवते.
अस्सल ग्रामीण जीवन त्यामध्ये रूजलेलं भागवत धर्माचे वारकरी संप्रदायाचे संस्कार, छोट्या—छोट्या गोष्टीत मोठा आनंद साजरा करण्याची, सर्वाचे सुख—दु:ख आपलेच मानून प्रत्येक प्रसंगात सहभाग नोंदवण्याची भूमिका—भावना त्याचबरोबर प्रत्येक आनंद त्या परमात्याला न विसरता त्याच्याशी अभिव्यक्त होणं असे अनेक प्रसंग लेखकाने अत्यंत आशयपूर्ण मोजक्या शब्दांत परिपूर्णतेने काळजाला भिडेल असे लिहिले आहे. चासकमान धरणक्षेत्रामुळे झालेले विस्थापन व वाताहत त्याचे विदारक सत्य त्यातून परिस्थितीशी केलेला संघर्ष, साधलेला समन्वय, स्विकारलेले सामंजस्य, जिद्द, ध्येयवाद, जोपासलेल्या निष्ठा, खडतर शैक्षणिक प्रवास वाचकांना चरित्रात गुंतवणून ठेवणारा आहे. चरित्र लेखनात लेखकाने तटस्थ भूमिका घेणं आवश्यक असतं परंतु लेखकाला स्व:ताची तटस्थता साभांळता आली नाही; कारण लेखकाची चरित्र नायकाशी असलेली पिता—पुत्र नात्याची भावनिक गुंतवणूक स्वाभाविक आहे, याचमुळे चरित्राला एक नवीन बाज मिळाला आहे.

 आशय आणि अभिव्यक्तीच्या आकृतीबंधात लेखकाने प्रकरण विभागाणीचे निकष न पाळता आशयाची परिपूर्णता अखंडित ठेवण्याच्या उद्देशाने अभिनव मांडणी करून साहित्यकृतीचे वेगळेपण जपले आहे. तसेच या ग्रंथाला डॉ. ज्ञानेश्वर थोरात सर यांनी समर्पक प्रस्तावना दिली आहे. ‘ह.भ.प. रावजीबुवाचे’ कार्य भागवत धर्माचे पुरस्कर्ते आहे. माणसाला माणसाप्रमाणे माणसांने समान वागणूक देत जातीधर्माच्या पलिकडे जाण्याचा वैश्विक संदेश या ‘शिल्पकार’ चरित्र ग्रंथातून आपल्याला मिळतो. वाचकांना हा चरित्रग्रंथ नक्कीच आवडेल आशा व्यक्त करतो.

—    शुभम वाळुंज, राजगूरूनगर
   
 

पुणे: पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात ३० जुलै २०१७ रोजी सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर मौजे-घेर सिंहगड हद्दीत घाटातील रस्त्यावर दरड कोसळली असून गडावरील मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. ही घटना सिंहगडावर जाताना धारजाई मंदिराच्या आसपास घडली आहे. यापुर्वी देखील या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. पावसाळ्याच्या  हंगामात व प्रत्येक शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर पर्यटकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात.
  अशा कालावधीत दरड कोसळल्यास मोठया प्रमाणात जिवित व वित्तहानी होऊ शकते यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव यांनी, केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम क्र.३४ व ३५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टिने रस्त्यावरील राडारोडा, दरडी हटविण्याचे काम पूर्ण होईपर्यंत पुढील आठ दिवसांकरिता सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून गडापर्यतचा रस्ता सार्वजनिक हिताच्या अनुषंगाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची वनविभागाने काटेकोर अंमलबजावणी करावी. आदेशाच्या अंमलबजावणीत कसुर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे: सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह 4 रुपये 31 पैसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 10 पैसे अधिक 1 रुपया 21 पैसे वहन (व्हिलींग) आकार व इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 10 पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 99 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते.

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी 24 तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक 1912, 18002003435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.


सर्वपक्षीय मराठा आमदार सरकारसोबत चर्चा करणार
मुबंई: मराठा समाजाच्या मागणीवर चर्चा करण्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन समन्वयकांनी फेटाळले. तर गुरूवारी रात्री मुबंईत झालेल्या सेल मराठा समाजाच्या बैठकीत मराठा समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे सर्वपक्षीय आमदारच चर्चा करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
 बैठकीतील निर्णय सरकारने ८ ऑगस्टपर्यत विधानसभेत आणि ९ ऑगस्टच्या मोर्चासमोर जाहीर करावा, असा सर्वानुमते निर्णय झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले. मराठा समाजाचे निवडून दिलेल्या सर्वपक्षीय आमदारांना याआधीच चर्चेसाठी सकल मराठा समाजाने बोलावले होते. त्यासंदर्भातील बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाली. त्याआधी मराठा समाजाचे नेतृत्व करणा-या विविध संघटना, प्रतिनिधी आणि नेत्यांची बैठक दादरमध्ये झाली. अखेर या बैठकानंतर मराठा समाजातर्फे सर्वपक्षीय आमदारच विधानसभा व विधान परिषदेतून मागण्यांवर चर्चा करतील, असा निर्णय झाल्याचे एका समन्वयकाने सांगितले.  


राजगुरूनगर: पुणे- नाशिक महामार्ग चौपदीकरण व बाह्यवळण क्षेत्रात संपादित होणा-या जमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम वाटप करण्यासंदर्भात शेतक-यांची विशेष बैठक आज शनिवारी (दि. ५) खेड पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी ३ वाजता होणार आहे. खेडचे प्रांत सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी या वेळी उपस्थित राहणार आहे.
राजगुरूनगर, चांडोली, होलेवाडी, ढोरे भांबूरवाडी, व राक्षेवाडी या गावातील मिळून १५.४४ हेक्टर (१५२४.३९ गुंठे) क्षेत्र बाह्यवळण कामासाठी संपादित होणार आहे. येथील सर्वेक्षण आणि नुकसानभरपाईची घोषणा झालेली आहे. मात्र ७/१२ तील गुंतागुंत आणि प्रलंबित नोंदी यामुळे नुकसानभरपाई घेण्यात शेतक-यांना अडचणी होत आहे. काही शेतक-यांना नुकसानभरपाई मिळाली आहे. काही खातेदारांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. ज्यांनी केली आहेत त्यात अनेक त्रुटी आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी शेतक-यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
   

  • चाकणला कामगारांसाठी रुग्णालय उभारणार
  • आमदार गोरे : 150 खाटांचे रुग्णालय उभारण्याची शासनाची ग्वाही

आळंदी -  मुंबई येथील सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात खेड तालुक्‍याचे आमदार सुरेश गोरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर शासनाने चाकण औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठी 150 खाटांचे रुग्णालय सुरु करण्या बाबतचा खुलासा केला आहे.
खेड तालुक्‍यातील चाकण परिसरातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना आरोग्य सेवा तसेच उच्च दर्जाचे उपचार मिळावेत, यासाठी चाकण औद्योगिक क्षेत्रात राज्य कामगार विमा महामंडळामार्फत 150 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव संमतीसाठी तसेच जमीन उपलब्धतेसाठी शासनास सादर केला असून शासनामार्फत रुग्णालय उभारणीस सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे यावेळी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी सांगितले. यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध होणार असून शासन त्यासाठीची सर्व आवश्‍यक कार्यवाही करत आहे असे उत्तर देण्यात आले.

याशिवाय ग्रामीण भागाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचे असणारे रस्ते, पाणी आणि वीज या विषयावर अधिवेशनात खेड तालुक्‍याचे शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी अधिवेशनात सभागृहात खेड तालुक्‍याचा मागण्या मांडल्या. यात रस्ते विकास बाबत ग्रामसडक योजना ही अतिशय चांगली योजना शासनाने आणली याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करीत मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या वाड्या, वस्त्यांचे रस्ते, तसेच पाणंद रस्ते करण्यासाठी एक स्वतंत्र कार्यक्रम राबविण्याची आवश्‍यकता आहे. वर्दळीच्या रस्त्यांची दर्जाउन्नती करण्याची आवश्‍यकता आहे. ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग यांच्या निधीत वाढ करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.

वीजेबाबतच्या प्रश्नात तालुक्‍यातील आदिवासी भागातील जुने विजेचे खांब तसेच डीपीची कामे करण्याची आवश्‍यकता आहे. ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात यावी. तालुक्‍यातील वाडा, डेहणे, करंजविहिरे येथे वीज उपकेंद्रांना जागा तसेच निधी उपलब्ध करून द्यावा. अशा विविध विषयावर प्रश्न मांडत खेड तालुक्‍यातील विकास कामला गती देण्यासाठी समस्या मांडल्या.

पेयजल योजनेचा निकष बदलावा
पिण्याच्या पाण्याबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठीचे निकष बदलण्याची आवश्‍यकता असून 2 वर्षांपासून या योजनेसाठी निधी मिळत नाही. निधी उपलब्ध करण्यात यावा. खेड तालुक्‍यात पाण्याचे स्रोत दूषित झाले असून कचरा निर्मूलनाची योग्य व्यवस्था करण्यात यावी. तालुक्‍यातील सर्व आदिवासी ठाकर वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठ्यासाठी ड्युअल पंप संच गरजेचा असून असे संच उपलब्ध करून द्यावेत, असे गोरे यांनी सांगितले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे

पुणे : चाकण टप्पा क्र. 5 मधील शेतजमीन दरनिश्चितीच्या सहमतीबाबत  शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रया लेखी स्वरुपात कळवाव्यात अशा सूचना, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी शुक्रवारी (दि. ४) दिल्या.

‘पीडीसीसी’बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये काळे यांच्या अध्यक्षतेखाली चाकण टप्पा क्र. 5 दरनिश्चितीबाबतची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस भूसंपादन अधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

एकूण दोन सत्रात बैठक पार पडली. पहिल्या सत्रात आंबेठाण, बिरदवडी, रोहकल येथील शेतकऱ्यांना ‘एमआयडीसी’मार्फत शासनाच्या नियमांना अनुसरुन 55 लाख प्रति एकर व दुस-या सत्रात गोनवडी, वाकीखुर्द, चाकण येथील शेतकऱ्यांना 65 लाख प्रति एकर दर निश्चित केलेला आहे, अशी माहिती देवून या बैठकीत शेतकऱ्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. तसेच या दरांत सहमत असलेल्या व नसलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रया लेखी स्वरुपात कळवाव्यात, लवकरात-लवकर त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली.

या वेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'ऑनलाईन' वीजबिल भरणा वाढविण्यासाठी

पश्चिम महाराष्ट्रात महावितरणचे उपक्रम सुरु

पुणे, दि. 04 : पश्चिम महाराष्ट्रातील वीजग्राहकांनी 'ऑनलाईन'द्वारे जास्तीतजास्त वीजबिलांचा भरणा करावा यासाठी महावितरणने विविध उपक्रम सुरु केले आहेत. याबाबतचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहे. वीजबिलांचा भरणा करण्यासाठी वीजग्राहकांनी 'ऑनलाईन' सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी त्यांच्या अत्याधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणने www.mahadiscom.in ही वेबसाईट मोबाईल ॲपच्या माध्यमातून सोय उपलब्ध करून दिलेली आहे. 'ऑनलाईन' वीजबिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या घरगुती किंवा इतर वीजबिलांचा भरणा फक्त 'ऑनलाईन'द्वारे भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तशा सूचनाही संबंधित कार्यालयप्रमुखांकडून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहे. याशिवाय महावितरणचे सर्व ग्राहक सुविधा केंद्र तसेत वीजबिल भरणा केंद्रात रांगेत असलेल्या वीजग्राहकांशी संवाद साधून मोबाईल ॅप, वेबसाईटद्वारे 'ऑनलाईन' वीजबिल भरण्याच्या प्रक्रियेची त्याच्या फायद्याची माहिती देण्यात येणार आहे. मोबाईल ॅपचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

शहरी भागात धनादेशाद्वारे वीजबिल मोठ्या प्रमाणात भरण्यात येत आहेत. धनादेशाद्वारे वीजबिल भरणार्या वीजग्राहकांची प्रत्यक्ष भेट घेऊन वीजबिलांचा भरणा 'ऑनलाईन'द्वारे करण्याचे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे. तसेच महावितरण ग्राहक संपर्क अभियानामार्फत ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा, इतर कार्यक्रम, आठवडी बाजार तसेच शहरी भागातील मोठमोठे घरगुती, व्यापारी संकुल आदी ठिकाणी महावितरण मोबाईल ॅप डाऊनलोड करणे, ॅपद्वारे वीजबिल भरणा इतर सेवांची माहिती देणे, मोबाईल क्रमांकाची नोंदणी याबाबत प्रात्यक्षिकांसह जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय महावितरणचे सर्व उपविभाग शाखा कार्यालय, वीजबिल भरणा केंद्र, ग्राहक सुविधा केंद्र आदी ठिकाणी 'ऑनलाईन' वीजबिल भरणाबाबत वीजग्राहकांना विशेषात्वाने माहिती देण्यात येणार आहे.

चौकट - कॉर्पोरेट वीजग्राहकांसाठी 'सेंट्रलाईज बील पेमेंट फॅसिलिटी'- महावितरणकडून कॉर्पोरेट वीजग्राहकांसाठी 'सेंट्रलाईज बील पेमेंट फॅसिलिटी' सुरु करण्यात आली आहे. पुणे, बारामती कोल्हापूर परिमंडलातील कॉर्पोरेट वीजग्राहकांचे एकाच शहरात किंवा राज्यात कोणत्याही ठिकाणी अनेक वीजजोडण्या असल्यास या सर्व वीजजोडण्याचे वीजबिल एकाच ठिकाणाहून वेबसाईटवरद्वारे 'एनईएफटी'/'आरटीजीएस'ने 'ऑनलाईन' भरण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणचे सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त लेखा) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त लेखा) यांनी पुढाकार घेऊन सरकारी किंवा खासगी कॉर्पोरेट वीजग्राहकांना 'सेंट्रलाईज बील पेमेंट फॅसिलिटी'ची माहिती द्यावी त्यांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश देण्यात आले आहे.

महात्मा गांधी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ भाऊ साठे जयंती साजरी....

राजगुरुनगरः महात्मा गांधी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने विशेष सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.

      कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. विनायक दीक्षित सर उपस्थित होते. जयंती पुण्यतिथी साजरी करताना आपण थोरामोठ्यांच्या  विचारांचा आदर्श अंगी बाणून पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत व सामाजिक जीवन त्यामुळे समृद्ध होत जाते ही खरी महापुरुषांना आदरांजली ठरेल असे मौलिक विचार त्यांनी मांडले.

     या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मा. सुनिल जाधव सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. ईशस्तवनानंतर ग. ना. देशपांडे सहाय्यक निधी अंतर्गत शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनी कार्तिकी जोशी हिने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट तिच्या भाषणातून मांडला तर युवराज ठाकुर या विद्यार्थ्याने मी लोकमान्य टिळक बोलतोय या एकपात्री प्रयोगातून टिळकांच्या कार्याचा परिचय करून दिला. यानिमित्ताने सौ. माधुरी काळभोर व विद्यार्थिनींनी लोकशाहीरांची लोकगीते व लोकमान्याच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. अर्चना गोडसे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनिता ठाकुर, श्री.तुलसीदास घोलप  व सौ. रंजना भांगरे यांनी केले. याच कार्यक्रमात विद्यालयाला सढळ हाताने मदत करणारे श्री. सोपान दगडू भांबुरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

चाकणचे तत्कालीन उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, मंडळ प्रमुखांवर गुन्हा दाखल !

६७ लाखांच्या अपहाराचा होणार पर्दाफाश; चार वर्षानी गुन्हा दाखल

चाकण: ग्रामपंचायत हद्दीतून कंपनीची केबल टाकण्यासाठी बनावट व खोटा दस्ताऐवज बनवून ग्रामपंचायतीची ६७ लाख ७५ हजारांची रकम्म हडप केली. याप्रकरणी तत्कालीन उपसरपंच प्रीतम परदेशी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी द्यानंद कोळी या दोघांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   चाकण नगर परिषेदेचे नगरसेवक तथा गटनेते किशोर ज्ञानोबा शेवकरी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण ग्रामपंचायत अस्तित्वात असताना, सन २०१३ ते २०१४ या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला होता.

   ग्रामपंचायतीच्या हद्दीत रिलायन्स जिओ इन्फो. लि. या कंपनीची फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम करावयाचे होते. परदेशी व कोळी यांनी संगनमत करून बनावट व खोटा दस्ताऐवज तयार केला. हा दस्ताऐवज खरा असल्याचा भासवून व त्याचा वापर करून, त्यांनी चाकण ग्रामपंचायतीला फक्त १ लाख रूपयांचा रोख भरणा दाखविला. उर्वरित ६७ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम श्री नवनाथ मित्र मंडळ, चाकण यांच्या येथील राजगुरूनगर सहकारी बॅक व लाला अर्बन को.ऑपरेटिव्ह बॅक यांच्या नावाने खाते उघडून बॅकेत भरले.

   त्यानंतर परदेशी यांनी वेळोवेळी नवनाथ मित्र मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व सचिव यांना हाताशी धरून वारंवार रक्कम काढली.

   पोलिस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.