• माजी आमदार दिलीप मोहिते यांचा करिष्मा कायम
  • तालुका अध्यक्षांच्या बहुळ गावातच शिवसेनेला दणका

khedtimes.today |
शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बिनविरोध झालेली साबळेवाडी ग्रामपंचायत वगळता उर्वरीत ४ ग्रामपंचायत निवडणुकीत ३ ग्रामपंचायतीवर यश मिळविल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.

तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादीने संमिश्र यश मिळविले असले तरी राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या खेड पूर्व भागावर वर्चस्व असल्याचे माजी आमदार दिलीप मोहितेंनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचयात निवडणुकीतही दाखवून दिले आहे. बहुळ, शेलगाव, दौंडकरवाडी या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी तर सिद्धेगव्हाण ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्याचा दावा शिवसेना जिल्हा अध्यक्ष राम गावडे यांनी केला आहे.

बहुळ येथून सरपंचपदाच्या निवडणुकीत गणेश शंकर वाडेकर (७९० मते) मिळवून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदी पंडित वाडेकर (२४५ मते), संगीता वाडेकर (२३९ मते), अंकुश साबळे (४०२ मते), दिपाली आरेकर (४१९ मते), सत्यवान पानसरे (४२९ मते), समाधान पानसरे (३४२ मते), पूजा पानसरे (२९७ मते), आदिक वाडेकर (३८० मते), बेबी वाडेकर (३६७ मते), रूपाली खलाटे (३८२ मते), अर्चना शेंडे (बिनविरोध) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

सिद्धेगव्हाण येथून सरपंचपदाच्या निवडणुकीत साधना प्रकाश चौधरी (३०७ मते) मिळवून विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदी वृषाली साबळे (८४ मते), अनिता मोरे (८५ मते), मोनिका गाडे (११७मते), अशोक गंगावणे (११३ मते), अशोक मोरे (१०९मते), नंदा गायकवाड (१०८ मते), निलेश चौधरी (बिनविरोध) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

दौंडकरवाडी येथून शकुंतला वामन लांडे सरपंचपदाच्या निवडणुकीत (७५६ मते) मिळवून विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदी गणेश लांडे (२३२ मते), रूपाली म्हांबरे (२३९ मते), सुरेखा लांडे (२३८ मते), शरद कड (२२८ मते), अश्विनी गायकवाड (२४९ मते), पुष्पा दौंडकर (२२५ मते), पूजा गुजर (२४८ मते), जयहिंद दौंडकर (२६२ मते), सिताराम गुजर (३११ मते) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

शेलगाव येथून नागेश नवनाथ आवटे सरपंचपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत ३४१ मते मिळवित फक्त २ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदी कैलास सुदाम आवटे (१३० मते), स्वामीनाथ दत्तात्रय पवार (१३२ मते), अलका रमेश आवटे (१२२ मते), रणजीत सुभाष हांडे (१७५ मते), काळूबाई ज्ञानोबा आवटे (१६५ मते), सपना क्षीरसागर (१५२ मते), सुरेखा हनुमंत आवटे (१६१ मते) हे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच साबळेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

थेट सरपंचपदाच्या निवडणुकीतून सगळ्यात कमी वयाचा तालुक्यातील पहिला सरपंच म्हणून शेलगावचे सरपंच नागेश आवटे आणि राष्ट्रवादीच्या उर्वरीत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे, जिल्हा परिषद व बांधकाम समिती सदस्या निर्मला पानसरे, राष्ट्रवादी जिल्हा युवक सरचिटणीस संग्राम सांडभोर आदींनी अभिनंदन केले.

khedtiems.today |
रामा त्याची बायको अन् लेकरांचे हात यंत्रासारखे राबत होते. साळलेल्या निरगुड अन् चिल्लारीच्या फोकाचे डाग तयार होऊ लागले. रामा गावात जाऊन दारोदार हिंडून येऊ लागला. कोणाला कोणत्या वस्तु बनवून पाहिजेत हे लोक, घरातल्या कर्त्या बाया त्याच्याकडे सांगू लागल्या. गाव तसं ओळखीचं. अडाणी असला तरी कोणत्या घरात कोणता डाग द्यायचा हे गणित मात्र पक्कं लक्षात रहात होतं. तर काही माणसं भेटताच ‘रामराम पाटील, सावकार मालक, दादा, बाबा म्हणत करीत चाललेला रामा.

काही बाया, बायकु लेकरांची चौकशी करायच्या ‘व्हय, तुमच्या आशिरवादानं खुशाल हाईत’ म्हणून पुढं जायचा. चावडी समोरून जाताना, चौथ-यावर काही रिकामटेकडी असायची, हाक मारून बोलवायची ‘कधी आलास’ म्हणून विचारायची.

‘कालच बि-हाड उतरलं माय-बाप’ म्हणून मोकळा व्हायचा, एखादा ‘आरं बसं की, वड बिडी’ म्हणून त्याच्या पुढ्यात एकादी बिडी टाकायचा, तो पटकन उचलून घ्यायच्या, दोन काड्या म्होरं टाकायच्या, मग आजूबाजूला एखादं आगपेटीचं तुटलेलं फुरकं बघून बीडी पेटवायची, झुरका मारून नाका-तोंडातनं धूर काढायचा. गावातली माणसं आपली आपुलकीनं चौकशी करतात याचा आनंद त्याच्या चेह-यावर ओसंडून वहायचा. ‘निघतो दादा’ म्हणून गाव धुंडाळयचा. म्हणजे कोणत्या घरी काय पाहीजे हा हिशोब करतच पालाची वाट धरायची.

उन्हाचा चटका वाढत होता, गार लिंबाच्या सावलीत बि-हाडातली बाया-माणसं कामाला लागलेली. दुरड्या, झाप, गणगुली, कुडवं, डाल, आकार घेऊ लागली. घराघरात लागणा-या वस्तु तयार होत होत्या. लेकरं हाताखाली राबत होती. रामा सकाळच्या पारी गावात माल डोक्यावर घेऊन पोचवायचा. त्या बदल्यात डागानुसार शेर, आठवा, आदली, पायली, पदरात धान्य पडायचं, दोन चार डाग दिलेल्या घरात मग ‘माय काय कोरड्यासाला दिलं तर बरं व्हईल’ अशी विनंती करायचा अन् पुन्हा कोळवं, चिपटंभर दाळ दाना धोतराचा सोग्यात बांधायचा, दुपारपर्यत गावात फिरायचं लेकरं भाकर-तुकडा मागत फिरायची.
मोठ्या डागापेक्षा लहान सान वस्तुला मागणी यायची. त्यात विषेशकरून गणगुली हा प्रकार जास्त असायचा. त्याला कारणही गावगाडा संस्कृतीत अतिशय मोठ्या प्रमाणात महत्व होतं. गणगुली ही बी-बियाणे भरून ठेवण्यासाठी वापरत असत. गोठ्यातलं शेण-काडी करत असताना काही प्रमाणात बाया ही गणगुली सारवायच्या. त्या उन्हात ओसरी किंवा अंगणात वाळत घालायच्या. चांगलं वाळून झाल्यावर पुन्हा ती एकवार सारवायची, वाळवायची व पुढील वर्षी पेरणीसाठी निवडक बी-बियाणे, गंधक, गॅमेझन, लिंबाचा पाला टाकूल त्यात बी भरायचे. तोंड पुन्हा लिंपून टाकायचे, गंधक व इतर किटकनाशक वनस्पतींनी बियाणे किडत नसत. ते पुन्हा पेरणीसाठी उपयोगात येत असे.

रामा कैकाड्याची बायको धुरपदा ही त्याच्यासारखीच काळीकुट्ट होती. नाळी डोळी निटस असणारी धुरपदाचं सौंदर्य या प्रापंचिक व पारंपारिक व्यवसायात राबून गेलं होतं. मनमिळाऊ व नम्रपणा हा तिच्या अंगी असल्यामुळे गावातल्या बाया तिला आपुलकीने वागवत. वंश परंपरागत चालत आलेला गधळपणा हा खरं तर काही मंडळीना शाप असाच ठरत होता. काही मोठ्या घरातल्या बायका या था-यालाही थांबत नसत. एकदंर भटकंती करणा-या या घटकांबाबत काहीच्या मनात घृणा निर्माण होत असायची. परंतु ग्रामसंस्कृतीतला प्रत्येक घटक हा एकमेकांना आधार होता.

धुरपदा कधी-कधी भाकरीसाठी दुरड्या, शेंगा वेचण्यासाठी कुडवं घेऊन फिरायची, तिची नागडी उघडी लेकरं मागं असायची, मग लेकरांची जुनी कापडं मागायची, कुणी एखादी चोळी, लुगडं, लेकरांची जुनी कापडं द्यायची. पोरं कापडं बघून हरकून जायची. पालावर येताच बांधून आणलेल्या गाठोड्यावर लेकरं तुटून पडायची, त्यात कापडं बेताची नसायचीत. लेकरांचं अंग झाकावं इतकाच हिशोब होता तो. अर्ध-अधिक फाटलेल्या जुनेर लुगड्याच्या धाड काढून ती अनेक ठिगळ्याचं लुगडं शिवायचं. गरीबीची इज्जत झाकण्यासाठी.

आठ-पंधरा दिस पालं टिकून होती. पांदणीची, वड्या-वगळीची, नदी काठाची, चिल्लारी, निरगुड सपाट होऊ लागली. नदीच्या डोहाचं पाणी कमी होत होतं. सवड मिळताच रामा लेकरांना घेऊन डोह गाठायचा. गुडघाभर, कमरंभर पाण्यात झिरझिर झालेल्या धोतरांना मासं धरायचा, धोतराच्या जाळ्यात चिंगळ्या, गाळात रूतलेल्या मुरग्या पोर नदीच्या डोहाला पडलेल्या बोळातनं खेकडं, डोक हातानं धरायची. संध्याकाळच्या जेवणाचा बेत जरा वेगळाच असायचा.
कामाचा ओघ कमी झाला होता. गाय पांढरीनं पोटापुरतं पदरात घातलेलं. दोन चार दिसात इथला मुक्काम हलवावा लागणार होता. पै-पावणं अजूबाजूच्या गावात मुक्कामी अशीच पालं ठोकून वस्तीला उतरलेली.

दिवस उगवायाच्या आत रामाच्या पालावर चार-सा पावणं जमा झाली. ख्याली खुशाली विचारली, चहाच्या पराती फिरल्या, कुणाची सुगी कसी झाली, सोयरीकीच्या गप्पा झाल्या अन् एका पावण्याला घेऊन रामानं चावडी गाठली. पाटील आडकित्यात सुपारी कातरत व्हतं, रामानं पायरीखालून ‘रामराम’ घातला. पाटलानं मानेनं होकारासाठी मान डोलावली. पाटील पान तंबाखू चघळत पायरीच्या कोप-यात पिचकारी टाकत बोलतं झालं.
‘बोलं,’
‘आमचा इतला शेर संपत आला मालक, दोन चार दिसात मुक्काम हलवतो बगा,’ दीनवाणी अवस्थेनं रामा बोलला. ‘आता काय काम काढलसं?’, ‘पावणं आल्यात, पाटील एखादं बोकाड (डुक्कर) दान करावं गरीबाला.’

पाटलाचा चेहरा किळमवाणी झाला. ‘बरं जा, धर जा’ रामा खुशीत उठला. हागणदारी गाठली. पाच पंचवीस डुकरातनं एक हेरलं, फास घेऊन ताणून धरलं, लांब वड्याकाठी गचपान टाकून भाजलं. पावण्यांनी पराती-पराती पोटात रिचवल्या, उरलेलं फासावर वाळत घातलं. पहाटं गावतली लोकं, बाया नाकाला पदर लावायच्या, पालाकडं बघून थुकायच्या, काही खासकन शिव्या हासाडायची. दुस-या दिवशी दिवस उगवायच्या आत पालं मोडायची. गाढवावर प्रपंच लादायचा. लहान लेकरं गाढवावर बसवून गडी माणसं पुढं चालायची. दिवस उगवायच्या आत गावाची शीव ओलांडायची, दिवस उगवताच नव्या गावाचा आधार घेत पुन्हा नव्या गावगाड्यात सामील व्हायचं.

- प्रकाश बनसोडे, ९९२२६८५१४४

khedtimes.today |

पहिल्यांदाच सरपंचपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत अधिकाधिक गावकारभारी राष्ट्रवादीच्या विचाराचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चुणूक दाखवून खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच ‘दादा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. २३ पैकी तब्बल १६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. उर्वरित ग्रामपंचायतीवर सेना, भाजपला समाधान मानावे लागले आहे. खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक सोसायट्या आणि ग्रामपंचायती असल्याने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अजूनही टिकून आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांना मानणारा मोठा मतदार असल्याचे निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झाले आहे. याउलट आमदार सुरेश गोरे यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. चासमधील ६९ वर्षी मुळूक आजी सरपंच झाल्या आहेत. कोरेगाव खुर्द येथील ग्रामपंचायतीमध्ये बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास गाळव हे सरपंच झाले, तर त्यांच्या पत्नी रत्ना गाळव सदस्य म्हणून निवडूण आल्या आहेत. साकुर्डी गावात ज्योती सुपे या सरपंच म्हणून निवडूण आल्या आहेत, त्याच सदस्य म्हणूनही विजयी झाले आहेत. खेड तालुक्यात येलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच दोन मतांनी, शेलगावचे सरपंच तीन, तर शिरोलीचे सरपंच अवघ्या चार मतांनी निवडून आले आहेत. येणिये खुर्दमध्येही भालेराव पती-पत्नी विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस २३ पैकी १४ ग्रामपंचायती तर दोन ग्रामपंचायती संमिश्र आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. राष्ट्रावादीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार खेड तालुक्यातील वाडा (संमिश्र), शिरोली, बहुळ, चास, दौंडकरवाडी, शेलगाव, येलवाडी, मांजरेवाडी, गारगोटवाडी, आंभु, येणिये खुर्द, आव्हाट, सुरकुंडी, साकुर्डी, देवोशी, बहिरवाडी (संमिश्र) याबरोबरच शिवसेनेने साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, मिरजेवाडी, पापळवाडी, कोरगाव, बहिरवाडी, साकुर्डी, येलवाडी, गारगोटवाडी, चास या गावांवर शिवसेनेची सत्ता आल्याचा दावा केला आहे. तर भाजपने वाडा, सुरकुंडी, देवोशी, गारगोटवाडी आणि अनावळे अशा पाच ग्रामपंचायतीवर सत्ता आल्याचा दावा केला आहे. एकूणच तीनही पक्षामध्ये मोठी चुरस लागली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या सारिपाटात तालुक्यात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमी ग्रामपंचायतीवर सत्ता आली; मात्र आकडे फुगवून सांगण्यात येत असल्याची टीका सेना-भाजपच्या नेत्यांनी सुरू केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

बहुळकारांकडून सेनेला ठेंगा

शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर यांचे बहूळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा धुव्वा उडवला. सरपंचासह नऊ सदस्य निवडून आणत राष्ट्रावादीने येथे सत्ता मिळवली. शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला गावातील नागरिकांनी पुन्हा कौल दिला आहे. बहूळ ग्रामपंचायतीची निवडणूक मोठी अटीतटीची झाली होती. खेड बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर यांचे हे गाव असल्याने राजकीयदृष्ट्या या गावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रचारकाळात दोन्ही पक्षाकडून मोठी ताकद लावण्यात आली होती. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिल्याने प्रकाश वाडेकर यांचे प्रयत्न फोल ठरले.

वर्षा बच्चे सरपंचदाच्या मानकरी

गारगोटवाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत अर्चना अशोक गारगोटे यांचा पराभव करीत थेट सरपंच होण्याचा पहिला मान वर्षा मनोहर बच्चे यांनी पटकवला. सात सदस्यांच्या जागेसाठी एकूण तीन वॉर्ड करण्यात आले होते. यातील वॉर्ड क्र. १ मध्ये राहुल भानुदास गारगोटे आणि सीमा अतुल गारगोटे यांची बिनविरोध निवड झाली. तर प्रभाग क्र. २ मधून सर्वसाधारण महिला राखीव जागेवर माया दत्ता कंद विजयी झाल्या. त्यांनी सीताबाई सत्यवान कंद यांचा सरळ लढतीत पराभव केला. याच प्रभागातील नागरिकांचा मागासप्रवर्ग जागेसाठी झालेल्या लढतीत सावळेराम धोंडिंबा गारगोटे यांनी विद्यमान उपसरपंच जितेंद्र हनुमंत काळोखे यांचा पराभव केला. प्रभाग क्र. ३ मध्ये एकूण तीन जागांसाठी निवडणूक झाली. यात सर्वसाधारण महिला जागेसाठी झालेल्या लढतीत नेहा माणिक गारगोटे यांनी अनिता अविनाश काळोखे यांचा पराभव केला. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या राखीव जागेवर रोहिणी नवनाथ काळोखे यांनी वैशाली शिवाजी काळोखे यांचा पराभव करुन विजयी झाल्या. सर्वसाधारण पुरुष जागेसाठी झालेल्या लढतीत सुखदेव लक्ष्मण शिंदे यांनी मधूकर गारगोटे यांचा पराभव केला.

रघुनाथ लांडगे वाडा गावचे सरपंच

पश्चिम पट्ट्यातील व्यापारी गाव म्हणून परिचित असलेल्या वाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रघुनाथ सदाशिव लांडगे यांनी विद्यमान उपसरपंच भगवान लांडगे यांचा पराभव केला. वाडा गावच्या १३ जागांपैकी सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. वाडा ग्रामपंचातीच्या निवडणुकीमध्ये भीमाशंकर वाडा ग्रामविकास पॅनेल व धर्मराज परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली गेली. धर्मराज परिवर्तन पॅनेलच्या पाठिंब्यावर रघुनाथ लांडगे व शिवाजी मोरे या दोघांनी प्रचार केला होता. रघुनाथ लांडगे यांनी १७२४ मते मिळवत विद्यमान उपसरपंच भगवान लांडगे यांचा पराभव केला. या निवडणुकीत भगवान लांडगे यांना ६९२, तर शिवाजी मोरे यांना ६९० मते मिळाली.


चासच्या ६९ वर्षीय मुळूक आजी ठरल्या कारभारी

चास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गावच्या राजकारणात प्रथमच ६९ वर्षीय सखुबाई बबन मुळूक विराजमान झाल्या आहेत. सदस्यपदासाठीही मोठी चुरस दिसून आली. सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होत्या. त्यामध्ये सखुबाई मुळूक व आशा मुळूक यांच्या मुख्य लढत झाली. सखुबाई मुळूक यांना ४८०, आशा मुळूक यांना ४२४ मते मिळाली. निवडणूक निकालानंतर सर्व नवनिर्वार्चित सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली.


शिरोलीमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’

शिरोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवार संगीत संपत केदारी अवघ्या चार मतांनी विजयी झाल्या. अकरा जागांचाही निकाल जाहीर होऊन अंबिकामाता जनविकास पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले. या निवडणुकीत विद्यमान सरपंच संजय सावंत, विद्यमान उपसरपंच गंगुबाई कडाळे यांच्यासह माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य मंगल संजय सावंत, विशाखा गणेश लोखंडे व मनसेचे कार्यकर्ते मंगेश सावंत यांचा पराभव झाला. सरपंच संगीता केदारी यांना १२०७ मते पडली. अंबिकामाता पॅनेलचे प्रमुख असलेले विद्यमान सरपंच संजय सावंत निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे शिरोलीत ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली आहे.

गाळव पुन्हा गावचे कारभारी

कोरेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास गाळव यांचा विजय झाला. पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नमाला गाळव यांचा विजय झाला. रत्नमाला गाळव आणि कैलास गाळव हे पती-पत्नी ग्रामपंचायतीवर निवडूण आले आहे. गावात पती-पत्नी दोघेही निवडणूक रिंगणात असल्यामुळे विशेष चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाच्या उमेदवार गाळव यांना ५५६ मते मिळाली. त्यांनी विरोधी उमेदवाराचा २३२ मतांनी पराभव केला.

khedtimes.today |
राजगुरूनगर : येथील खेड मार्केटमध्ये सिताफळांची मोठी आवक झाली आहे. शेतक-यांना त्यांच्या विक्री झालेल्या मालांची रोख रक्कम मिळत असून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.

शेतकरी बाजारात पहाटे ४ वाजता शेतीमालाची विक्री सुरू होते. शिरूर तालुक्यातील पाबळ, मलठण खेड तालुक्यातील निमगाव, दावडी, खुरपुडी, रेटवडी, वाफगाव, गुळाणी, वाकळवाडी, कडूस, चास, कमान, वाडा, आंबेगाव तालुक्यातील पेठ-पारगाव या भागातील शेतकरी सिताफळे विक्रीसाठी आणतात, अशी माहिती शेतकरी बाजार विभागप्रमुख सोपान चव्हाण यांनी दिली.

सरासरी सिताफळांच्या एका कॅरेटला प्रतवारीनुसार ५०० ते १५०० रूपये भाव मिळतो. एका कॅरेटचे वजन २० किलो असते. सरासरी दररोज ४०० कॅरेटची आवक होत असते. मुख्यता ठाकर समाजातील शेतकरी सिताफळे मोठ्या प्रमाणात विक्री करीता आणतात.

बाजार समितीने शेतकरी व व्यापारी यांच्या करीता लाईट, पार्किेग, फिल्टरचे पाणी, स्वच्छता गृह इत्यादीची सोय बाजार समितीने केलेली आहे. शेतक-यांनी सिताफळ हा शेतीमाल विक्रीसाठी आणताना प्रतवारी आणावा. त्यामुळे त्यास चांगला भाव मिळेल असे आवाहन बाजार समितीचे सभापती नवनाथशेठ होले व सचिव सतीश चांभारे यांनी केले आहे.

khedtimes.today |
राजगुरूनगर : येथील खेड मार्केटमध्ये सिताफळांची मोठी आवक झाली आहे. शेतक-यांना त्यांच्या विक्री झालेल्या मालांची रोख रक्कम मिळत असून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.

शेतकरी बाजारात पहाटे ४ वाजता शेतीमालाची विक्री सुरू होते. शिरूर तालुक्यातील पाबळ, मलठण खेड तालुक्यातील निमगाव, दावडी, खुरपुडी, रेटवडी, वाफगाव, गुळाणी, वाकळवाडी, कडूस, चास, कमान, वाडा, आंबेगाव तालुक्यातील पेठ-पारगाव या भागातील शेतकरी सिताफळे विक्रीसाठी आणतात, अशी माहिती शेतकरी बाजार विभागप्रमुख सोपान चव्हाण यांनी दिली.

सरासरी सिताफळांच्या एका कॅरेटला प्रतवारीनुसार ५०० ते १५०० रूपये भाव मिळतो. एका कॅरेटचे वजन २० किलो असते. सरासरी दररोज ४०० कॅरेटची आवक होत असते. मुख्यता ठाकर समाजातील शेतकरी सिताफळे मोठ्या प्रमाणात विक्री करीता आणतात.

बाजार समितीने शेतकरी व व्यापारी यांच्या करीता लाईट, पार्किेग, फिल्टरचे पाणी, स्वच्छता गृह इत्यादीची सोय बाजार समितीने केलेली आहे. शेतक-यांनी सिताफळ हा शेतीमाल विक्रीसाठी आणताना प्रतवारी आणावा. त्यामुळे त्यास चांगला भाव मिळेल असे आवाहन बाजार समितीचे सभापती नवनाथशेठ होले व सचिव सतीश चांभारे यांनी केले आहे.

khedtimes.today |
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत प्रस्तावीत रिंग रोड मुळे शहरातील कनेक्टीव्हीटी चांगली होणार आहे. या रिंग रोड मुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरातील ट्रॅफिकही कमी होणार आहे. प्रचंड वेगाने नागरिकीकरण होत असल्यामुळे पीएमआरडीएने सुनियोजित नियोजन केले असून याचा निश्चितच नागरिकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करुन त्यांना विकसित प्लॉट देण्यात येतील. यात कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयोजित टि. पी. स्कीम कार्यशाळा, सोनाई कार्यालय उरुळी देवाची येथे ते बोलत होते. या कार्यशाळेसाठी रिंगरोड क्षेत्रात येणा-या उरुळी देवाची, वडकी, फुरसुंगी, फडतरे वाडी, गायकवाडवाडी, सायकरवाडी, तरवडी या गावातील संबधित जमिनधारकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी निरसन केले.

प्रकल्पबाधित लोकांचे प्रश्न सोडविण्यात येतील, शेतक-यापर्यंत या योजनेसंदर्भात योग्य माहिती पोहोचविली जाईल. प्रत्येक गोष्टीची कल्पना शेतक-यांना देऊनच या कामास सुरुवात केली जाईल. सर्वांच्या फायद्यासाठीच ही योजना असून यामुळे सर्व नागरिकांची सोय होणार आहे. लवकरच या परिसरात पीएमआरडीएचे कार्यालय सुरु करण्यात येईल. ज्यामुळे नागरिकांना नकाशाव्दारे अधिका-यांकडून थेट माहिती मिळू शकेल व शंकांचे निरसन करण्यात येईल असेही शिवतारे यांनी सांगितले.

प्रस्तावीत रिंग रोड १२९ कि.मी.चा असून शेतकऱ्यांची संमती मिळाल्यापासून तीन महिन्यात ड्राफ्ट टाऊन प्लॅनिंग स्किम तयार करण्यात येईल. पाणी, गटारे, वीज तसेच गार्डन, शाळा, दवाखाने, बसस्टँड, पार्कींगची जागा, ओपनस्पेसच्या सर्व सुविधा पीएमआरडीएमार्फत पुरविल्या जातील. या योजनेमार्फत शेतक-यांना आठपट फायदा होईल. रिंगरोड जवळील शेतक-यांना रिंगरोड लगतच जमिन मिळेल. शेतक-यांना चौकोनी आकाराचे भुखंड देण्यात येईल. प्रत्येक प्लॉटला रस्ता देण्यात येईल अशी माहिती गित्ते यांनी दिली.

या कार्यशाळेस पीएमआरडीएचे नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनिल वांढेकर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सासकर, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, राजीव भाडळे, सचिन घुले, ग्रामपंचायत सदस्य प्रविण कामठे, संदिप मोडक आणि संबधित गावांचे सरपंच तसेच जमिनधारक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

khedtimes.today |
कोयाळी तर्फे वाडा : खेड तालुक्यातील पश्चिम भागात भुईमुग पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. भुईमूग हे या भागातील महत्वाचे खरीप पिक आहे. या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भुईमुग पिकाची पेरणी केली जाते.

यंदा जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट झालेली दिसून येत आहे. भुईमूग पिकासाठी पेरणी, कोळपणी, खुरपणी, काढणी यांवर मजूरीचा भरमसाठ खर्च होतो. मात्र उत्पादन कमी झाल्याने शेतक-यांना परवडत नाही.

त्यातच भर म्हणून सुरु असलेल्या पावसामुळे भुईमूग पिकाचे व शेंगाचे मोठे प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे.


khedtimes.today |
कोयाळी तर्फे वाडा : खेड तालुक्यातील पश्चिम भागात भुईमुग पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. भुईमूग हे या भागातील महत्वाचे खरीप पिक आहे. या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भुईमुग पिकाची पेरणी केली जाते.

यंदा जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट झालेली दिसून येत आहे. भुईमूग पिकासाठी पेरणी, कोळपणी, खुरपणी, काढणी यांवर मजूरीचा भरमसाठ खर्च होतो. मात्र उत्पादन कमी झाल्याने शेतक-यांना परवडत नाही.

त्यातच भर म्हणून सुरु असलेल्या पावसामुळे भुईमूग पिकाचे व शेंगाचे मोठे प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे.


  • थेट सरपंच पदामुळे निवडणूक प्रचारात रंगत

विवेक बच्चे
khedtimes.today |
शेलपिंपळगाव : खेड पूर्व भागातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे.गावचा 'मुख्यमंत्री' बनण्यासाठी सरपंच पदाच्या उमेदवारांनी घरन् घर पिंजून काढायला सुरुवात केली आहे.

प्रचाराची रणधुमाळी पाहता ही निवडणूक ग्रामपंचायतीची की आमदारकीची असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. नेहमीच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सरपंचपदाचा उमेदवार थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून बहुमताने निवडून सरपंच होण्यासाठी होणाऱ्या घोड़ेबाजाराला लगाम लागला असून, सरपंचपदी रहायचे असेल, तर वरिष्ठ पक्ष नेते व ग्रामपंचायत सदस्यांची मनधरणी करण्यापेक्षा, मतदारांची मनोभावे पायधरणी केलेली बरी. काहीसे असे भाव सरपंचपदाच्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत.

सध्या शेतातील कामाचे दिवस असल्याने मतदारांना भेटायला सकाळी लवकर उमेदवारांसह भावकी व नातेवाईकांचे जत्थेच्या जत्थे मतदारांच्या घरी जात आहेत. थेट विकास निधी ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने सरपंचाला ग्रामविकासात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. "गावचा विकास करून दाखविणच" अशी आश्वासने देत उमेदवारांनी मी अमुक एक पक्षाचा म्हणण्यापेक्षा 'मी तुमचाच' म्हणून मतदारांना साद घालायला सुरुवात केली आहे.

तळेगाव - शिक्रापुर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या बहुळ गावात रस्त्याच्या कडेला सर्वत्र लागलेले सरपंचपदाचा उमेदवार...अशा आशयाचे प्रचाराचे फ्लेक्स जाता येता सर्वांचेच लक्ष वेधुन घेत आहेत. बहुळ, सिद्धेगव्हाण, शेलगाव, दौंडकरवाडी या निवडणूक होत असलेल्या सर्व गावांमधून लोकसंख्येने मोठ्या असलेल्या बहुळ गावात शिवसेनेच्या सरपंच वर्षा वाडेकर, शिवसेनेचे अध्यक्ष प्रकाश वाडेकर, राष्ट्रवादीच्या जि.प.सदस्या व माजी सरपंच निर्मला पानसरे, राष्ट्रवादीचे कृ. उ.बा.स.संचालक व मा. उपसरपंच धैर्यशील पानसरे हे दिग्गज सरपंचपदाच्या पंचरंगी लढतीतून आपआपल्या पक्षाचे वर्चस्व सिद्ध करण्यास सज्ज झाले आहेत.

सिद्धेगव्हाण गावात अल्पावधीत विकास कामांचा डोंगर रचून आदर्श सरपंच पुरस्कार मिळविलेले सरपंच शशिकांत मोरे यांनी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न केले; परंतु एकमत न झाल्याने सिद्धेगव्हाण गावासह उर्वरित शेलगाव, दौंडकरवाडी मधून सरपंचपदाची दुरंगी लढत होणार असून गावा गावातील आपापल्या दिग्गज सेनापतींच्या जोरावर आ. सुरेश गोरे व मा. आ.दिलीप मोहिते यांची तालुक्यातील ग्रामपंचायत लढाई जिंकून आगामी विधानसभेचे निवडणूक युद्ध कोण जिंकणार हे दाखवून द्यायची जोरदार तयारी सुरु आहे.

khedtimes.today |
पुणे : धनकवडीतील करंजी, चकली, बेसन लाडू, पोह्याचा चिवडा आदींना ऑस्ट्रेलियातून मागणी झाली असून, सुमारे १५० किलो दिवाळीचे फराळाचे खाद्यपदार्थ उद्या रविवारी विमानाने पाठविण्यात येत आहेत. आस्ट्रेलियातील आमच्या काही परिचित नागरिकांनी दिवाळीचे पदार्थ तयार करून मागितले होते. त्यामुळे तातडीने आम्ही हे पदार्थ तयार करून पाठवत आहोत. अशी माहिती संकल्प महिला गृहउद्योग या प्रकल्पाच्या संचालिका सुलोचना भोसले यांनी सांगितले.

बचत गटाचे काम करतच तिने दुकानातूनच दिवाळीचा फराळ विक्री करण्याचे तिचे स्वप्न होते. ते तिने प्रत्यक्षात आणले. आणि ना नफा - ना तोटा या तत्वावर तिने नागरिकांना दिवाळीचे फराळाचे पदार्थ विक्री करण्यास सुरुवातही केली. ही घटना आहे, धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील पुणे महापालिकेच्या कोठीजवळील संकल्प महिला गृहउद्योगाची आणि त्यांच्या संचालिका सौ. सुलक्षणा भोसले यांची आहे.

भोसले यांनी धनकवडी परिसरातील नागरिकांसाठी खास दिवाळीचा मुहूर्त साधून ना नफा ना तोटा या धर्तीवर दिवाळी फराळाचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले आहे. त्यांच्या खारी करंजीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गृहउद्योगातर्फे भाजणी चकली, बेसन लाडू, शंकरपाळी, खजूर लाडू, करंजी, अनारसे, रवा लाडू, ओल्या नारळाची करंजी आदी पदार्थ कमी दारात विक्रीस ठेवण्यात आले आहेत.

धनकवडी, कात्रज, आंबेगाव, नर्हे, आंबेगाव आदी परिसरातील नागरिक हे पदार्थ खरेदी करण्यासाठी येत आहेत. यासंदर्भात बोलताना भोसले यांनी सांगितले की, अनेक महिलांना नोकरी व अन्य कामामुळे घरी दिवाळीचे खाद्यपदार्थ तयार करणे अवघड असते. त्यामुळे त्यांना खास घरी तयार केलेले फराळाचे पदार्थ दिवाळीसाठी हवे असतात. हे लक्षात घेऊन आम्ही बचतगटाच्या महिलांच्या मदतीने घरीच फराळाचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. सध्या मशीनवरही हे पदार्थ तयार करून मिळतात. पण आम्ही नागरिकांची गरज व मागणी लक्षात ठेवून खास घरीच पदार्थ तयार केले. तसेच माझ्याकडे काम करण्यास येत असलेल्या महिलांना या माध्यमातून रोजगार मिळेल हे सुद्धा मी ठरवले. सध्या आम्ही ८-१० महिलांच्या मदतीने खाद्यपदार्थ तयार विक्री करत आहोत.

या उपक्रमास मनीषा देशमुख, चेतना तांबे, उमा गणगोटे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे.