राज्य

राज्य (17)

khedtimes.today |
पुणे : मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाखो तरुण स्वयंरोजगाराकडे वळत आहेत.या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे भांडवल लागत नसल्यामुळे तरुणांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन रोजगार मिळवण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे, असे प्रतिपादन केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा प्रशासन पुणे आयोजित 'मुद्रा प्रोत्साहन अभियान', बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे ते बोलत होते.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महाराष्ट्र बँकेचे मुख्य व्यवस्थापक रवींद्र मराठे, महापौर मुक्ता टिळक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, डीएफएस दिल्लीचे अशोककुमार डोगरा,एमएसएलआरएमच्या मुख्य व्यवस्थापक आर. विमला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दिनेश डोके आदी मान्यवर तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व बँकेच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांबद्दल माहिती देण्यासाठी ३८ स्टॉल्स लावले होते. त्याद्वारे नागरिकांना मुद्रा योजनेविषयी माहिती तसेच रजिस्ट्रेशन करून देण्यात आले. कार्यक्रमात बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना कर्जवाटप करण्यात आले. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आला. तसेच मुद्रा योजनेअंतर्गत मंजूर तरुणांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. ‘मुद्रा यशोगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शासनाच्या विविध योजनाप्रमाणेच मुद्रा योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. यामधून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार व्हावेत हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.कुठल्याही प्रकारचे तारण नसल्यामुळे लाभार्थ्याला याद्वारे कर्ज मिळवणे सोपे जाते.सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येत आहे. ४ कोटी तरुणांचा पूर्वी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नसताना त्यांनी मुद्रा योजनेच्या साह्याने व्यवसायात उडी घेतली आहे. मुद्रा योजनेच्या मदतीने सावकाराच्या जाळ्यातून मुक्तता होईल. मुद्रा योजना ही स्वयंरोजगाराचे नवे दालन आहे. 'नव्या भारताची नवी आकांक्षा, नवी योजना मुद्रा योजना' अशी घोषणा जावडेकर यांनी दिली.

khedtimes.today |
नागपूर : दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सुत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्‍यांना १३,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. तसेच कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

नागपूर येथील बिजली नगर येथे ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. बैठकीला तिनही कंपन्यांचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सर्वश्री सचिन ढोले, विनोद बोंन्द्रे आणि सुरज वाघमारे यांचेसह वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतची घोषणा केली. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळें वीज कर्मचा-यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

khedtimes.today |
कोल्हापूर : यंदाच्या हंगामी एफआरपी पेक्षा 300 रु. अधिक उसला दर घेतल्याशिवाय रयत क्रांती संघटना पाठीमागे येणार नाही प्रसंगी आंदोलन करू, असा इशारा राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलाय. ते इचलकरंजी इथं आयोजित रयत क्रांती संघटनेच्या राज्यातील पहिल्या शेतकरी मेळाव्याला बोलत होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळात उस दर आणि शेती हमी भावासाठी शेतकर्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, लागत होते मात्र चर्चेतून संवाद साधला जात नव्हता. आता शेतकर्यांना घाबरायचे कारण नाही. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणू सरकारमध्ये बसलोय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हलकलपट्टी केल्यानंतर रयत क्रांती संघानेच्या माध्यमातून सावता सुभा मांडणाऱ्या कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी नव्या संघटनेचा आज पहिला शेतकरी मेळावा घेतला. इचलकरंजी इथं आयोजित शेतकरी मेळाव्याला पश्‍चिम महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शेतकरी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचं नाव न घेता टीका केली. रयत क्रांती संघटनेच्या स्थापनेमुळे आमचा टवका ही निघणार नाही, अशी खिल्ली उडवणाऱ्या नेत्यांच्या संघटनेला भगदाड पडल्याचे दिसून आले असेल, असा टोला मंत्री खोत यांनी नाव न घेता खा. राजू शेट्टी यांना लगावला. माझ्यावर चौकशी समिती नव्हे तर विनोद समिती नेमली होती, असे ही मंत्री खोत यांनी सांगितले. वर्षे घरावर तुळशी पत्र ठेऊन शेतकर्यांसाठी रक्त सांडणार्या कार्यकर्त्याला तुम्ही पक्ष निष्ठा कशी विचारता?, असा हल्ला खा. शेट्टी यांनी नेमलेल्या चौकशी समिती संदर्भात बोलताना लगावला.

सदाभाऊ म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी 32 वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले आहे. त्यामुळे माझा मंत्रिपदाचा राजीनामा फक्त शेतकरी मागू शकतील बाकी कोणालाही याचा अधिकार नाही. शरद पवार यांच्या नावाने ओरडून राजकारण करणाऱ्या लंकापतींनी बाहेर येऊन रयत क्रांती कुठे चालली आहे हे पाहावे, अशा शब्दांत त्यांनी स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर निशाना साधला.’रयत क्रांती संघटना’ ऑक्‍टोबरपासून राज्यात उडीद डाळ विक्री केंद्र सुरू करणार आहे. यंदा कर्जमाफीमुळे शेतकरी दिवाळी धुमधडाक्‍यात साजरी करतील. त्याचबरोबर यावर्षी ऊसासाठी शेतकऱ्याला आंदोलन करावे लागणार नाही. कारण एफआरपी अधिक रुपये असा यावेळी ऊसाचा अंतिम दर राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचबरोबर शेतकऱ्याला योग्य वजनाच्या ऊसाचा योग्य भाव मिळावा यासाठी ऊसाचे वजन काटे तपासणार असल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर बलिदान देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

कोणाची संघटना मोडण्यासाठी नाही तर गोरगरीब शेतकऱ्यांचे संसार उभारण्यासाठी आमची संघटना कार्यरत राहील. उसाचा हंगाम सुरु झाला. काही नेते कारखानदारांशी संगनमत करून आंदोलन करतात, शेतकऱ्यांना फसवल्याचे धंदे आता बंद करावेत, सोन्याच्या लंकेतून लंकापती यांनी आता बाहेर पडावे आणि रयत कोणत्या बाजूने जात आहे, हे पाहावे आणि याची तपासणी करावी. असं सांगत जे कारखाने दर देणार नाही त्यांना वटणीवर आणू असा इशारा त्यांनी दिला आहे.

  • महंतांच्या केसालाही धक्का लागणार नाही

khedtimes.today |
सावरगाव : जनतेचा आग्रह अन्‌ गादीचा आदेश यात भगवान बाबांच्या जन्मभूमीचा मध्यबिंदू साधला. समाधी दर्शनासाठी आज गडावर जाता आले नाही याच्या मनाला प्रचंड वेदना होतात. कर्मभूमीने नाही तर आता जन्मभूमीने स्वीकारले. येथून नवा इतिहास घडविणार आहे. हा मेळावा पंकजाचा नसून गोरगरीब, वंचित, उपेक्षित व सामान्य बहुजनांचा आहे असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. महंतांसोबत आपले वाद नाहीत हे स्पष्ट करतानाच त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. मात्र, भगवान बाबांच्या विचार, आचारांना नख लावण्याचे काम त्यांच्याकडून होऊ नये एवढी अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.

महंत नामदेवशास्त्री यांनी केलेल्या विरोधामुळे यंदा प्रथमच संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे शनिवारी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला. याप्रसंगी मंत्री महादेव जानकर, प्रा. राम शिंदे, भगवान बाबा मंदिर ट्रस्टचे गहिनीनाथ सानप, माजी आ. केशव आंधळे, राधा सानप, बुवासाहेब खाडे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे,आ. ऍड. लक्ष्मण पवार, आ. प्रा. संगीता ठोंबरे, गयाबाई कऱ्हाड , जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, प्रवीण घुगे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांची उपस्थिती होती.Pankaja 21

मेळाव्यातील अर्ध्या तासाच्या भाषणात पंकजा यांनी महंत व त्यांच्यातील वाद व त्यानंतर झालेल्या टीका- टिप्पणींना उत्तर दिले. संपूर्ण भाषणात त्यांचा रोख महंतांच्या दिशेने होता; परंतु गडाचा अन्‌ गादीचा अवमान कधी आपल्याकडून होणार नाही असे स्पष्ट करायलाही त्या विसरल्या नाहीत. त्या म्हणाल्या, सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या काना कोपजयातून लोक आले. या विराट गर्दीने मला संघर्ष करण्याची ताकद दिली आहे. कातड्याचे जोडे केले तरी उपकार फिटणार नाहीत अशी कृतज्ञता व्यक्त करुन त्या पुढे म्हणाल्या, संबंध महाराष्ट्राने आज लोकभावना पाहिली आहे. आच्या गर्दीने मेळावा जगमान्य झाला आहे. जनता पंकजासोबत आहे असे नाही तर पंकजा जनतेसोबत आहे हे यातून सिद्ध होते. माझ्या ओठातला शब्द जनतेच्या पोटातला असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. गडावर मेळावा घेण्यास महंतांनी विरोध केल्यानंतर गतवर्षी पायथ्याला मेळावा घेतला. मात्र, माझं काय चुकलं? हा प्रश्न मी स्वत:लाच विचारला. या प्रश्नाने मी व्यथित झाले.

विजयादशमीनिमित्त मेळावा ही वैभवाची परंपरा आहे. भगवान बाबांची शपथ घेऊन सांगते मी सर्व महापुरुषांच्या जयंती- पुण्यतिथी कार्यक्रमांना आवर्जून जाते. मला दोन वर्षांत अनेकांनी विचारलं पंकजा हे नेमके काय झालेयं? मेळावा घ्यावा यासाठी मला भेटायला राज्यभरातून लोक आले. विमानतळावरही मला अडवलं. गादीचा आदेश मानायचा की जनतेचा आग्रह त्यामुळे मी भगवान बाबांच्या जन्मभूमीवर मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. उपस्थितांना उद्देशून पंकजा यांनी खरं सांगा हा मेळावा पंकजाचा आहे की तुमचा असा सवाल केला.

दसरा मेळावा गडावर घेण्यास महंत नामदेवशास्त्री यांनी केलेल्या विरोधानंतर अहमदनगर प्रशासनानेही परवानगी नाकारली होती. त्यामुळे मेळावा कोठे होणार? व पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. शनिवारी दुपारी बारा वाजता पंकजा मुंडे यांचे सावरगाव घाट येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. तत्पूर्वी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांची महारॅली गोपीनाथगडावरून सावरगाव घाटमध्ये पोहोचली. ग्रामस्थांनी पंकजा व प्रीतम यांचे उत्साहात स्वागत केले. घरोघर गुढ्या, अंगणात सुबक रांगोळी काढलेली होती. खचाखच गर्दीने सावरगाव घाट फुलून गेले होते.

  • लेकीचं सरकार, महंत सुरक्षित!

गोरगरीब, हातावर पोट असणारे व कोयता हातात घेऊन जगण्यासाठी लढणारे बांधव दरवर्षी मेळाव्यानिमित्त गडावर एकत्रित येत. त्यांना तेथे पैसे मिळत नव्हते तर उर्जा मिळत होती. आज गडावर काय चित्र आहे. याची एक क्‍लिप माझ्या मोबाइलवर आली. त्यात भक्तांपेक्षा पोलीस अधिक दिसताहेत. अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा दिमतीला आहे. सरकार कोणाचं आहे? लेकीचं सरकार आहे. महंतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. महंत शंभर वर्ऱ्षे जगावेत पण भगवान बाबांच्या आचार अन्‌ विचारांना धक्का लागू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  • … तर नेतृत्व सोडायला तयार

माझी ताकद वाढावी किंवा मला काही फायदा व्हावा यासाठी दसरा मेळावा नसल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ज्या दिवशी या गोरगरीब, वंचित, उपेक्षित समाजात उत्कृष्ठ नेतृत्व तयार होईल, त्या दिवशी मी माघार घेईन अन्‌ त्याला बोटाला धरुन पुढे नेईन. गोपीनाथ गडाच्या निर्मितीनंतर मी ट्रस्टतर्फे समाजातील 42 मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली आहेत. त्यापैकी अनेक जण मोठ्या हुद्द्यावर गेली आहेत.

  • भगवान बाबांची पाण्यावर तरंगणारी भव्य मूर्ती उभारणार

पंकजा मुंडे यांनी भाषणाच्या शेवटी भगवान बाबांच्या जन्मस्थळाचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. भगवान बाबांची पाण्यावर तरंगणारी ज्ञानेश्वरी वाचतानाची भव्य मूर्ती उभारणार आहे. ही मूर्ती पंचक्रोशीत कोणालाही दिसू शकेल अशी असणार आहे.

  • महंतांच्या त्या भाषणाने व्यथित

गोपीनाथगडाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देशभरातून लोक आले होते. यावेळी मंहतांनी आपल्या भाषणात आता भगवानगडाचा श्वास मोकळा झाला असे विधान केले. आम्ही गडाचा श्वास गुदमरून ठेवला होता का? असा सवाल करुन गडावर यापुढे मेळावा नाही या फतव्याने व्यथित झाल्याचे पंकजा यांनी सांगितले. महंत असे बोलू शकत नाहीत असे वाटले. मात्र, त्यांचा आदेश शिरसावंद्य मानला. त्यांच्या काणाला कोण लागले? याचे उत्तर काळच देईल असे त्या म्हणाल्या. डिसेंबर मध्ये माझे अन्‌ त्यांचे शेवटचे बोलणे झाले. त्यावेळी घडेलला प्रसंगही त्यांनी मेळाव्यात मांडला. त्या म्हणाल्या, गोपीनाथगडावरील भाषणानंतर असा आघात बरा नाही. बाप-लेक सांमजस्याने बोलू असे समजून मी शेवगावला प्रचारासाठी जाताना भगवानगडावर गेले. त्यावेळी महंत गादीवर बसले होते. यापूर्वी त्यांना मी कधी गादीवर बसलेले पाहिले नव्हते. मोनिका राजळे सोबत होत्या. आम्ही त्यांचे दर्शन घेतले. त्यांनी चहा मागविला; पण मंदिरात नेले नाही. मी त्यांना सांगितले, येण्यास उशीर झाला. रस्ता चुकल्याने गडाला वळसा घालून यावे लागले. त्यावर ते म्हणाले, तुम्ही निघा तुम्हाला उशीर होईल. त्यानंतर माझा अन्‌ त्यांचा संवाद झाला नाही.

  • पंकजा गहिवरल्या, जनसमुदाय स्तब्ध

पंकजा यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्ते घोषणा देत होते. घोषणा देऊ नका अशी विनंती पंकजा वारंवार करत होत्या; पण कार्यकर्ते अधून-मधून घोषणा देत होते. टाळ्या वाजवून त्यांच्या प्रत्येक वाक्‍याला दाद देत होते. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावेळी झालेल्या दगडफेकीनंतर अनेकजण भीती पोटी पळाले. मी दगड लागेल याची फिकीर केली नाही. मी वडील गमावले होते; पण त्याही दु:खी प्रसंगी माईक हातात घेऊन भगवान बाबांची शपथ… शांत रहा असे बजावले. मला माझ्यापेक्षा तुमची काळजी आहे. मी मुंबईला असेन, दिल्लीत असेन पण तुमच्या हाकेला धावून येते असे त्या भावूक होऊन म्हणाल्या. सोबतच गडावर दर्शनासाठी जाता आले नाही याच्या वेदना होतात असे सांगताना देखील त्या गहिवरल्या. त्यानंतर समोर बसलेला विराट जनसमूदाय देखील स्तब्ध झाला. पंकजांना गहिवरलेले पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचे चित्र दिसत होते.

khedtimes.today |
नारायण राणे यांनी नवीन पक्षाची आज घोषणा केलीये. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे राणेंच्या पक्षाचे नाव आहे.

दरम्यान यावेळी राणेंनी शिवसेनेवरही टीका केलीये. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असून कंत्राटात टक्केवारी द्यावी लागते. भ्रष्टाचारामुळेच मुंबईत मराठी माणसाला घर घेता येत नाही. महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असल्याने उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.

khedtimes.today |
शिर्डी :जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले साईबाबांचे शिर्डी अखेर हवाई मार्गाने जोडले गेले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज  शिर्डी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले असून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

शिर्डीमध्ये विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी १९९० च्या दशकात करण्यात आली होती. हवाई सेवेमार्गे शिर्डीला पोहोचण्यासाठी मुंबई किंवा औरंगाबादला उतरावे लागते. मुंबईपासून सुमारे पाच- साडेपाच तास, तर औरंगाबादहून तीन तास प्रवास करुन शिर्डीला जाता येते. शिर्डीत रेल्वे स्थानक आहे. मात्र लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनी जायचे झाल्यास कोपरगाव किंवा मनमाडला उतरावे लागते. शिर्डीत राज्यासह देशविदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने शिर्डीत विमानतळ व्हावा अशी मागणी केली जात होती.

अखेर दोन तपांच्या प्रतीक्षेनंतर शिर्डी विमानतळाचे काम मार्गी लागले  आहे. राहता तालुक्यातील काकडी गावात हे विमानतळ असून या विमानतळाचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  शिर्डीत विमानतळ झाल्याने आता मुंबईतून शिर्डीला ३५ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे.

सध्या शिर्डी विमानतळावरून  दिवसा विमाने उड्डाण करू शकतील. रात्री विमानसेवा सुरू व्हावी, म्हणून धावपट्टी वाढविण्याचे काम सुरू आहे. ते काम जानेवारीत पुर्ण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बांधलेला हा पहिलाच विमानतळ असून त्याचे नियमनही हिच कंपनी करणार आहे. देशात आतापर्यंत भारतीय विमानतळ प्राधिकरण विमानतळाची उभारणी करून तिचे संचलन करते. पण एखाद्या राज्याने असा उपक्रम करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

khedtimes.today |
मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळपासूनच मुंबई शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावरील पत्र्याचा काही भाग खाली कोसळल्याचे वृत्त समोर आले. मात्र पूल सुरक्षित होता. पण या घटनेदरम्यान प्रवाशांमध्ये पूल पडल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमका याचसुमारास जोरदार पाऊस पडला आणि अनेक प्रवासी बाहेर न जाता खोळंबले होते. त्यात नवीन येणारी प्रत्येक गाडी हजारो प्रवासी या दोन्ही स्टेशनांवर येत होते.

त्यामुळे थोड्याच वेळात या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. त्यात झालेल्या लहान घटनेमध्ये पूल पडल्याच्या अफवेची भर पडली. काही जणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची अफवाही पसरवली. या सगळ्याचा विपरीत परिणाम होत प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता वाढली. ब्रिजबाहेर निघण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने ब्रिजच्या बाजूला लावलेले पत्रे फोडून लोकांना बाहेर काढावं लागलं.

जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे. जखमींसाठी रक्ताची कमी जाणवत असून ए-नीगेटीव्ह (A-), बी- निगेटीव्ह (B-), एबी निगेटीव्ह (AB-) रक्तगट असणाऱ्यांनी केईएम रुग्णालयाशी लवकरात लवकर संपर्क करण्याचं आव्हान करण्यात आलंय.

  • पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत चांगलाच राडा झाला.
  • मंत्री आणि आमदारांमध्ये जुंपल्याने प्रकरण शिवीगाळ व हातघाईवर गेले.
  • खा. श्रीरंग बारणे यांच्याशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे उपनेत्या आ. नीलम गो-हे यांना रडू कोसळले.

khedtimes.today |
मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत चांगलाच राडा झाला. मंत्री आणि आमदारांमध्ये जुंपल्याने प्रकरण शिवीगाळ व हातघाईवर गेले. खा. श्रीरंग बारणे यांच्याशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे उपनेत्या आ. नीलम गो-हे यांना रडू कोसळले.

‘मातोश्री’वर झालेल्या या बैठकीची माहिती बाहेर जाऊ नये, म्हणून सर्वांचे मोबाइल बंद ठेवण्यात आले होते. प्रारंभीच आमदारांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध नाराजीचा सूर लावला. आ. भरत गोगावले यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मंत्र्यांनी पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. मंत्री आमची कामे करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

त्यावर मंत्री रामदास कदम चांगलेच भडकले. ‘आम्हाला मंत्री बनण्याची खाज नाही, जे मंत्री तुमची कामे करत नाहीत त्यांची नावे घेऊन बोला. सगळ्यांना एकाच पारड्यात का मोजता?’ असे रामदास कदम यांनी खडसावले. त्यावर ‘मला उद्धव ठाकरेंनी विचारले, तर नाव सांगेन. तुम्हाला का सांगू,’ असा प्रतिप्रश्न आ. गोगावले यांनी केल्याने दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.

नीलम गो-हेंना अश्रू अनावर

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट झाली नव्हती म्हणून आ. नीलम गो-हे पुण्याहून चितळेंचे पेढे घेऊन बैठकीला आल्या होत्या. पेढे-पुष्पगुच्छ देऊन ठाकरेंचे अभीष्टचिंतन केले. बैठकीत खा. श्रीरंग बारणे यांनी गो-हे यांच्याविरोधात ‘कॉमेन्ट’ केल्याने दोघांत शाब्दिक चकमक उडाली. स्वत: उद्धव यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. बैठक संपल्यानंतर त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली, त्या वेळी ‘हे असले वागणे आम्ही कसे सहन करायचे?’ असे म्हणत नीलम गो-हे यांना अश्रू आवरणे कठीण झाले.

निवडणूक नको

काही आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा आग्रह धरला. त्याला आ. शंभूराजे देसाई, आ. राजेश क्षीरसागर यांनी विरोध केला. सरकार पाडून निवडणुकीला कसे सामारे जायचे? हवे तर ज्या मंत्र्यांबद्दल नाराजी आहे त्यांना दूर करा, अशा सूचना त्यांनी केल्याचे समजते.

सर्वांशी बोलून निर्णय : उद्धव

कधी सत्तेतून बाहेर पडा म्हणता, कधी सत्तेत राहा म्हणता. आपापसांत भांडता. हे चालणार नाही. मुख्यमंत्री गोड बोलतील, पण तुमची कामे करणार नाहीत. उद्यापासून विभागवार आमदारांच्या बैठका घेईन. सर्वांशी बोलून माझा निर्णय जाहीर करेन.

सत्तेत राहायचे की नाही, लवकरच ठरेल!
महागाई वाढली आहे. गोरगरिबांच्या चुली बंद पडत असतील, तर सत्तेत कशासाठी राहायचे? अनेक आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महागाईविरुद्ध राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या पोटावर उठणा-यांसोबत सत्तेत राहायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. आम्ही गरिबांच्या चुली बंद पडू देणार नाही.
- खा. संजय राऊत

नेमके काय घडले?

खा. श्रीरंग बारणे आणि खा. शिवाजीराव आढळराव पाटील पक्ष सोडून जाणार, अशी सध्या चर्चा आहे. स्वत: खा.बारणे यांनीच बैठकीत हा विषय उपस्थित केला. त्यावर, आढळराव पक्ष सोडणार नाहीत, असे आ. गो-हे यांनी ठामपणे सांगितले. त्यांचे हे विधान बारणे यांना चांगलेच झोंबले. ‘तुम्ही कशाला मध्ये बोलता, तुम्ही तर लक्ष्मण जगताप यांना तिकीट द्यायला निघाला होतात,’ असा टोमणा खा. बारणे यांनी मारला. त्यावरून उभयतांमध्ये चांगलीच जुंपल्याचे बैठकीत असलेल्या नेत्याने सांगितले.

khedtimes.today |
नाशिक : वणीच्या सप्तश्रृंगी गडावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बोकडबळीच्या प्रथेवर बंदी आणण्याचा  निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना जर गडावर आता बोकडाचा बळी द्यायचा असेल, तर तो यापुढे देता येणार नाही. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या बोकडबळी प्रथेला फाटा देत ही प्रथाच बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचं सगळीकडून स्वागत केलं जातं आहे.

सप्तश्रृंगी गडावर गेल्या वर्षी एका दुर्घटनेमध्ये गडावरचे १२ भाविक जखमी झाले होते, त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला असल्याचं समजतं आहे. बोकडबळी प्रथेनंतर मानवंदना देण्याची प्रथा आहे. त्यावेळी हवेत गोळीबार केला जातो. गेल्या वर्षी हवेत केलेल्या गोळीबारात गडावरचे १२ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे बोकडबळीची ही प्रथा बंद करण्याच निर्णय घेतला गेला.

सप्तश्रृंगी मंदिर परिसरात दिल्या जाणाऱ्या बोकडबळीवर बंदी घालण्यात आली असली तरी भाविकांमार्फत वैयक्तिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी नाही. पण मंदिर परिसरात बंदी कायम राहील. असं मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं .

  • सीआयआरटीच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न

khedtimes.today |
पुणे : देशाच्या प्रगतीसाठी सार्वजनिक वाहतूक अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी सार्वजनिक वाहतूकीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

भोसरी येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट या केंद्रीय संशोधन संस्थेच्या 50 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेफ ॲण्ड सस्टेनेबल  पब्लिक ट्रान्सपोर्ट या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदे दरम्यान ते बोलत होते. यावेळी खा. अमर साबळे, खा. अनिल शिरोळे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे, केंद्रीय वाहतूक परिवहन केंद्र भोसरी संचालक कॅप्टन राजेंद्र सणेर पाटील, आंध्रप्रदेश राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.मलाकोंडया, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय संयुक्त सचिव अभय दामले उपस्थित होते.

पुढे गडकरी म्हणाले, सार्वजनिक वाहतूक देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवशक आहे. काळानुरुप वाहतूक व्यवस्थेत योग्य तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना चांगली सेवा देणे गरजेचे आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी नव्याने देशातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार आहे, ही समिती रस्ते सुरक्षित कसे करावेत, अपघात कसे टाळावेत, धोकादायक ठिकाणांबद्दलची माहिती, सूचना व हरकती राज्य शासनासह केंद्राला पाठवणार आहे. यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी देशात अनेक ठिकाणी ॲक्सेस कंट्रोल हायवे बनवणे, मुंबई व पुण्यात मिथेनॉल निर्मितीचे पायलट प्रोजेक्ट बनवणे, जास्तीत जास्त इलेक्ट्रिक, राज्य वाहतूक व्यवस्थे अंतरगत असलेल्या बस स्टॉपची उत्तमरित्या सुधारणा, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महामार्गावरील टोलनाक्यांवर न थांबता टोल भरणे, विद्युत दुचाकीची संकल्पनेची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रभावी खर्च, प्रदूषण मुक्त गाड्या वापरण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमा दरम्यान आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे तंत्रज्ञान व्यवस्थापन व सीआयआरटीने पेटंट केलेल्या वाहतूक विभागासाठी आरएफआईडी आणि व्हिडिओ विश्लेषणचा उपयोग करून ड्रायव्हिंग कौशल्याचे प्रमाणपत्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी, सेंट्रल इन्सटिट्यूट ऑफ रोड ट्रास्पोर्टचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निरजा आपटे यांनी तर आशिष मिश्रा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Page 1 of 2