विद्यार्थ्यामध्ये जग बदलण्याची ताकद : प्रा. निलेश कोरडे

By October 02, 2017 0

khedtimes.today |
राजगुरूनगर : विद्यार्थ्यांमध्ये जग परिवर्तन करण्याचे सामर्थ्य असून स्वतःच्या बुद्धी व कर्तृत्वाच्या जोरावर ते जग बदलू शकतात असे, प्रतिपादन युवा व्याख्याते प्रा.निलेश कोरडे यांनी केले.

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल जाधव, महाविद्यालयाचे विभागाप्रमुख सुभाष देशमुख, उपमुख्याध्यापक नंदकुमार पवार, पर्यवेक्षिका उर्मिला ससाणे, पर्यवेक्षक दशरथ पिलगर, बाळासाहेब गाडेकर, पांडुरंग डावरे, अविनाश कहाणे उपस्थित होते.

प्रा.कोरडे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यानी स्वतः च्या अंर्तमनाचा आवाज ऐकला पाहिजे. मनातून नैराश्य व न्यूनगंड ह्या भावना काढून टाकल्या पाहिजेत. महापुरुषांनी आपल्या उच्च स्वप्नांना कष्टाची जोड दिल्यामुळेच जगाच्या इतिहासात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. आपणही यातून प्रेरणा घेतली पाहिजे.

यावेळी महात्मा गांधी यांच्या जीवनावर दुर्वा टाकळकर व लाल बहादूर यांच्या जीवनावर ऋतुराज काळे यांची भाषणे झाली. जयंतीनिमित्त विद्यालयात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन अस्मिता पाठक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व आभार तुळशीराम घोलप यांनी केले.

Last modified on Wednesday, 04 October 2017 09:41