माउलीच्या पालखीचे हरीनाम गजरात सिमोल्लंघन

By October 02, 2017 0

khedtimes.today |
आळंदी : येथील खंडोबाचे माळरानावर माउलींच्या पालखीसह श्री रामाची पालखी, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज पालखी, श्री भैरवनाथ महाराज ग्रामदैवत पालखीचे हरीनाम गजरात सिमोल्लंघन झाले. भाविकांनी श्रीचे पालखीचे दर्शनास गर्दी केली. टाळ, मृदंग, वीणेच्या त्रिनादात दिंड्यांतील भाविकांनी नाम जयघोष केला. श्रींचे आरतीनंतर वैभवी पालखीचे परतीचा प्रवास हरिनाम गजरात झाला.

यावेळी खंडोबाचे माळरानावर भाविक भक्तांसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी नागरिक, विविध संस्थानचे पदाधिकारी, सेवक उपस्थित होते. आळंदीतील विजयादशमी दसरा आणि नवरात्रीतील प्रथा परंपरांचे पालन करीत संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. विजया दशमीनिमित आळंदी परिसरात मोठा उत्साह होता. घर परिसर स्वच्छता, रांगोळी, घर, दुकाने, मंदिर, मठाला आकर्षक पुष्प सजावट करून तोरणे बांधण्यात आली होती. विविध मंदिर परिसरात भाविकांचे दर्शनास रांगा लागल्या होत्या.

माउली मंदिरात भल्या पहाटे घंटानादाने विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला. यात काकडा आरती, पवमान अभिषेक पूजा, भाविकांच्या पुजा, अभिषेक, भाविकांचे श्रीचे संजीवन समाधी दर्शन, श्रीना महानैवेध्य, माउलीचे बागेत शमी पूजन मोठ्या उत्साहात झाले. विना मंडपात वारकरी शिक्षण संस्थेतर्फे प्रवचन सेवा झाल्यानंतर श्रींची पालखी सिमोल्लंघन लवाजम्यासह निघाली.

खंडोबाचे माळरानावर श्रीचे पालखी पाठोपाठ हरीनाम गजरात श्री रामाची पालखी, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज पालखी, श्री भैरवनाथ महाराज ग्रामदैवत पालखी चे हरीनाम गजरात सिमोल्लंघनास आगमन झाले. आळंदीकर नागरिक, विविध संस्थानचे पदाधिकारी, भाविकांनी श्रीचे पालखीचे, श्री ग्रामदैवत, श्री खंडोबा देवांचे रांगा लावून दर्शनास गर्दी केली.

सोन्याचे प्रतिक असलेली आपट्याची पाने एकमेकांना देत आलीगन दिले. चांगले विचार जोपासण्याचा संदेश देत आपट्याची पाने मित्र परिवारास यावेळी देण्यात आली. वारकरी, भाविक दिंड्या दिड्यातील भजन, अभंग, श्रीचे पूजन, शमीचे पूजन, आपट्याचे पूजन, आरती नंतर श्रीचे पालख्या सिमोल्लंघन करून माउली मंदिर मार्गे हरीनाम गजरात मार्गस्त झाल्या. आळंदी देवस्थानचे वतीने मानकरी, सेवक, पदाधिकारी यांचा नारळ प्रसाद देवून सत्कार करण्यात आला.

माउली मंदिरात भाविकांचे दर्शनाची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्रीचे पालखीचे सिमोल्लंघन नंतर माउली मंदिरात धुपारती झाली. नंतर माउली मंदिरात नित्य नैमितिक धार्मिक उपक्रम झाले. त्यानंतर शेजारती झाली. खंडोबाचे माळरानावर भाविकांची वाढती गर्दी आणि कमी झालेला प्रशस्त जागा परिसर पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आळंदी देवस्थान, आळंदी नगरपालिका यांनी समन्वय साधून खंडोबा मंदिर प्रांगण प्रशस्त करण्याची गरज भाविकांनी व्यक्त केली. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त दसरादिनी असल्याने अनेक नवोपक्रम प्रारंभ, नवी वाहने खरेदी नंतर पूजेस माउली मंदिर परिसरात भाविकांसह वाहन धारकांनी गर्दी केली होती.

  • पद्मावती देवी मंदिरात विविध धार्मिक उपक्रम

पुरातन पद्मावती देवी मंदीरात घटस्थापनेपासुन सलग दहा दिवस आळंदीकरांच्या प्रथापरंपरेप्रमाणे गावकरी भजन सेवा, विविध धार्मिक कार्यक्रम पद्मावती देवीचा जागर करण्यात आला. दहाही दिवस आळंदीसह परिसरातुन देवी भक्त येथे दर्शनासाठी आले. भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. देवीभक्तांना व भाविकांना प्रसाद म्हणून दुधाचे वाटप करण्यात आले. पाचव्या माळेला माऊलींची पालखी पद्मावती देवी मंदीरास भेट देऊन, पुढे विश्रांतीवाडी मार्गे मानकरी भोसले वस्तीवर विसावली. भोसले परिवारातर्फे भजन, किर्तन, विसावा व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पद्मावती देवी माऊलींच्या पालखी भेटी दरम्यान धार्मिकतेचा जागर करीत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गावकरी भजनात नियमित कुऱ्हाडे, घुंडरे, रानवडे, भोसले, वहिले आदींनी भजनसेवा रुजू केली. नवरात्रौ उत्सवात भक्तीचे अखंड जागराने परिसर भक्तीरसात चिंब झाला. आळंदी परिसरात विविध मंडळांचे वतीने रास दांडीया, गरबा नृत्य, महिला व लहानग्यातही विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. आळंदीचे नगरसेवक आदित्य घुंडरे, सचिन घुंडरे, रानबाबा तरुण मंडळ, पद्मावती ग्रुप, तुळजाभवानी मंदिर आदी ठिकाणी धार्मिक उपक्रम आणि स्पर्धांचे आकर्षक बक्षिसे देऊन आयोजन उत्साहात करण्यात आले.

Last modified on Monday, 02 October 2017 11:00