राष्ट्रपतींच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण

khedtimes.today |
शिर्डी :जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले साईबाबांचे शिर्डी अखेर हवाई मार्गाने जोडले गेले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज  शिर्डी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले असून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

शिर्डीमध्ये विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी १९९० च्या दशकात करण्यात आली होती. हवाई सेवेमार्गे शिर्डीला पोहोचण्यासाठी मुंबई किंवा औरंगाबादला उतरावे लागते. मुंबईपासून सुमारे पाच- साडेपाच तास, तर औरंगाबादहून तीन तास प्रवास करुन शिर्डीला जाता येते. शिर्डीत रेल्वे स्थानक आहे. मात्र लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनी जायचे झाल्यास कोपरगाव किंवा मनमाडला उतरावे लागते. शिर्डीत राज्यासह देशविदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने शिर्डीत विमानतळ व्हावा अशी मागणी केली जात होती.

अखेर दोन तपांच्या प्रतीक्षेनंतर शिर्डी विमानतळाचे काम मार्गी लागले  आहे. राहता तालुक्यातील काकडी गावात हे विमानतळ असून या विमानतळाचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  शिर्डीत विमानतळ झाल्याने आता मुंबईतून शिर्डीला ३५ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे.

सध्या शिर्डी विमानतळावरून  दिवसा विमाने उड्डाण करू शकतील. रात्री विमानसेवा सुरू व्हावी, म्हणून धावपट्टी वाढविण्याचे काम सुरू आहे. ते काम जानेवारीत पुर्ण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बांधलेला हा पहिलाच विमानतळ असून त्याचे नियमनही हिच कंपनी करणार आहे. देशात आतापर्यंत भारतीय विमानतळ प्राधिकरण विमानतळाची उभारणी करून तिचे संचलन करते. पण एखाद्या राज्याने असा उपक्रम करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

Rate this item
(0 votes)
Last modified on Sunday, 01 October 2017 14:03