भारत-न्यूझीलंड सामना 25 ऑक्‍टोबर रोजी पुण्यात रंगणार

By September 29, 2017 0
  • एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे 25 ऑक्‍टोबर रोजी आयोजन

khedtimes.today |
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असून हा सामना बुधवार, दि. 25 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने पुण्यातील क्रिकेटप्रेमींना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा आनंद लुटता येणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना असून याआधी या स्टेडियमवर भारताचे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध एकदिवसीय सामने रंगले होते.
न्यूझीलंड क्रिकेट संघ याआधी केवळ दोनदा पुणे शहरामध्ये एकदिवसीय क्रिकेट सामना खेळण्यास आला होता. 1995-96 मध्ये झालेल्या न्यूझिलंड आणि भारत या दोन देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील एक सामना पुण्यामध्ये झाला होता. या सामन्यामध्ये भारताने पाहूण्या न्यूझिलंड संघाला पाच गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर 8 वर्षांनी “ट्रान्स-टास्मानियन क्‍लासिक कॉन्टेस्ट’ मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान एकदिवसीय सामना खेळला गेला होता आणि उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघावर केवळ एक गडी राखून निसटता विजय मिळवला होता. मात्र हे दोन्ही एकदिवसीय क्रिकेट सामने पुण्यातील नेहरू स्टेडियम मैदानावर खेळवण्यात आले होते.

पुण्यामध्ये होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन आता गहूंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होते. याच वर्षी 23 फेब्रुवारी 2017 रोजी एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. हा पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता आणि त्यामुळे तो ऐतिहासिक ठरला होता. एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. न्यूझीलंडचा एकदिवसीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच एमसीए स्टेडियमवर जागतिक एकदिवसीय क्रमांकावर अव्वल स्थानावर असणाऱ्या भारतीय संघाशी दोन हात करणार आहे.

एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर याआधी झालेल्या दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने संमिश्र कामगिरी केली आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर या वर्षी 15 जानेवारी 2017 रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने सनसनाटी विजय मिळवला.

या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि स्थानिक खेळाडू केदार जाधव यांनी धडाकेबाज शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. “हाऊसफुल्ल’ झालेल्या या सामन्यात विराट आणि केदार यांच्या खेळीने उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव मिळवून दिला होता. भारतीय दौऱ्यावर येणारा न्यूझीड संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून हे सामने पुण्यासह मुंबई आणि कानपुर येथे होणार आहेत. केन विल्यमसन कर्णधार असलेला न्यूझीड संघ भारत दौऱ्यात तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळणार असून हे सामने दिल्ली, राजकोट आणि तिरूअनंतपूरम येथे होणार आहेत.

भारत-न्यूझीलंड सामन्याची तिकीटविक्री आजपासून
भारत न न्यूझीलंड यांच्यातील आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या अधिकृत तिकीटविक्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आजपासून सकाळी 10ः00 वाजता प्रारंभ करणार आहे. क्रिकेटप्रेमींना दोनप्रकारे तिकिटे विकत घेता येतील अशी सुविधा एमसीएने केली आहे. यात ऑनलाईन पर्याय असेल. त्यासाठी “डब्लूडब्लूडब्लू डॉट बुकमायशो डॉट कॉम’ हे संकेतस्थळ आहे. याशिवाय प्रत्यक्ष तिकीटविक्री भांडारकर रोडवरील पीवायसी हिंदू जिमखाना तसेच गहुंजे येथील एमसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अशा दोन ठिकाणी होणार आहे. या दोन्ही ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत तिकीटविक्रीचे काऊंटर सुरू राहणार आहेत.

पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी हा दिवस-रात्र (डे-नाईट) सामना एक आनंदाची पर्वणीच असेल. याआधी पुण्यामध्ये झालेला भारत-इंग्लंड एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना हाऊसफुल झाला होता आणि त्या सामन्यात भारताने विजय मिळवत उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव मिळवून दिला होता. यापूर्वी 13 ऑक्‍टोबर 2013 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील झालेला एकदिवसीय सामना हा एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. त्यामुळे तो ऐतिहासिक ठरला होता.

भारत-न्यूझीलंड सामन्याचे तिकीटविक्रीचे दर असे आहेत –
वेस्ट स्टॅंड व ईस्ट स्टॅंड – 800 रु., साऊथ अप्पर- 1100 रु., साऊथ लोअर- 2000 रु., साऊथ वेस्ट व साऊथ ईस्ट स्टॅंड- 1750 रु., नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टॅंड- 1750 रु., नॉर्थ स्टॅंड- 2000 रु., साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी- 3500 रु..
कॉर्पोरेट बॉक्‍समध्ये प्रत्येकी 12 जणांसाठी आसनक्षमता आहे. त्यासाठी एका कॉर्पोरेट बॉक्‍सचे सहा लाख रुपये शुल्क आहे.

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे- महत्वाचे टप्पे –
21 डिसेंबर 2011- महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश यांच्यातील रणजी करंडक लढतीने औपचारिक उद्‌घाटन
1 एप्रिल 2012- एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे उद्‌घाटन
8 एप्रिल 2012- आयपीएल-2 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पुणे वॉरियर्स यांच्यात सामना
20 डिसेंबरः 2012- पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामना – भारत वि. इंग्लंड
13 ऑक्‍टोबर 2013- पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना – भारत वि. ऑस्ट्रेलिया
9 नोव्हेंबर 2015- बीसीसीआयकडून स्टेडियमला कसोटी दर्जा
24 फेब्रुवारी 2016- पहिला रणजी करंडक अंतिम सामना
9 फेब्रुवारी 2016- दुसरा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामना – भारत वि.श्रीलंका
15 जानेवारी 2017- दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना – भारत वि. इंग्लंड
23 फेब्रुवारी 2017- पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना – भारत वि. ऑस्ट्रेलिया.

Last modified on Friday, 29 September 2017 17:01