राजगुरुनगर नगर परिषदेच्या आकृतीबंधाला अखेर मंजुरी

By September 29, 2017 0

khedtimes.today |
राजगुरूनगर : गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला राजगुरुनगर नगर परिषदेच्या आकृतीबंधाला अखेर मंजुरी मिळाली असून राजगुरुनगर नगरपरिषदेत राज्यस्तरीय वर्गातील ११ व राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त २८ पदे भरण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.

राजगुरुनगर शहराचा आकृतीबंध मंजुरीबाबत काल(दि.२६)रोजी मंत्रालयात नगराध्यक्ष बापू थिगळे, उपाध्यक्ष संदीप सांडभोर, नगरसेवक मनोहर सांडभोर यांनी प्रत्यक्ष भेट मजूर पदांचा जीआर पाहून राजगुरुनगर नगर परिषदेत मंजूर झालेली पदे तत्काळ भरण्याची नगरविकास विभागाच्या सचिवांकडे मागणी केली. याबाबतची माहिती देण्यासाठी आज नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली या प्रत्रकार परिषदेला नगरसेवक सुरेखा क्षोत्रीय, मनोहर सांडभोर, सचिन मधवे, किशोर ओसवाल, सुरेश कौदरे उपस्थित होते. राजगुरुनगर नगर परिषदेचा आकृती गेली अनेक दिवसांपासून सरकारच्या उदासीनतेमुळे लालफितीत अडकला होता. राजगुरुनगरचा आकृतीबंध लवकर मंजूर होण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले होते मात्र गेली दीडवर्षे तो मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आकृतिबंध मंजूर नसल्याने शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित होते. अपुरा आणि प्रशिक्षित स्टाफ नसल्याने राजगुरुनगर शहरातील अनेक कामे ठप्प होती. जे कामगार काम करीत होते त्यांना पुरेसा पगार मिळत नव्हता. पाणी आरोग्य स्वच्छता आदी विभागातील कामांना गती नव्हती. लेखापाल, कर निरीक्षक, स्थापत्य अभियंता, स्वच्छता अभियंता आदी महत्वाचे अधिकारी नसल्याने विकासात आणि कामात अनेक अडथळे येत होते.

राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषद, नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थामधील पाधांच्या आकृतीबंधास शासनाने दि २२ सप्टेंबर २०१७ ला मान्यता दिली आहे. राज्यातील २७ नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्या आकृतीबंधास शासनाने मान्यता दिली असून पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर ही एकमेव नगर परिषद आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या आकृतीबंधात शासनाने मंजूर केलेली पदे कंसांत संख्या पुढील प्रमाणे:राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त पदे : लिपिक/टंकलेखक (१० पदे), स्वच्छता निरीक्षक (३ पदे), गाळणी चालक/प्रयोगशाळा सहाय्यक(१ पद),पंप ऑपरेटर/ वीजतंत्र/जोडारी(३ पदे), तारतंत्री/वायरमन (३ पदे), शिपाई (३ पदे), मुकादम (४ पदे), व्होल्वमन (१ पद), राज्यस्तरीय संवर्गातील पदे : सहाय्यक कार्यालय अधीक्षक (एक पद),सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक(१ पद), सहाय्यक समाजकल्याण माहिती व जनसंपर्क अधिकारी( १ पद), करनिरीक्षक(१ पद), लेखापाल(१ पद), लेखा परीक्षक( १ पद), स्थापत्य अभियंता ग्रेड-अ (२ पदे), पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता ग्रेड-अ (२ पदे), नगररचनाकार सार्वजनिक बांधकाम ग्रेड अ (१ पद).

राज्यातील आकृतीबंध मंजूर करण्यात आलेल्या २७ नगरपरिषद, नगरपंचायतीची नावे कणसात जिल्हा पुढील प्रमाणे: राजगुरुनगर (पुणे), खंडाळा, मढा, कोरेगाव, पाटण, दहिवडी, खटाव, वडूज(सातारा), खानापूर, कवठेमहांकाळ,शिराळा, कडेगाव, पलूस(सांगली), वाडा, विक्रमगड, तलासरी,माखाडा (पालघर), देवगड-जामसांडे (सिंधुदुर्ग), वाडवड, वरणगाव (जळगाव), रेणापूर (लातूर), सिंदेवाही, गडचांदूर, नागभीड(चंद्रपूर), पारशिवणी, वाडी, वानाडोंगरी (नागपूर), हुपरी(कोल्हापूर).

राज्य शासनाने राजगुरुनगर नगर परिषदेत ३९ अधिकारी कर्मचारी यांना मान्यता दिल्याने त्यांच्या पगारापोटी वर्षाला ९४ लाख ३२ हजार १८० रुपये खर्चाची तरतूद केली आहे. राज्य शासनाकडून राज्यस्तरीय संवर्गातील ११ पदे येत्या १५ दिवसांत भरली जाणार असून राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त २८ पदे भरण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असल्याने त्यांच्याकडे प्राप्त प्रस्तावानुसार ही पदे भरण्यात येणार आहेत. राजगुरुनगर नगरपरिषदेत सफाई कर्मचायाबाबत मात्र निर्णय झाला नाही. २५ हजार लोकसंख्येप्रमाणे हजारी एक कर्मचारी असा जीआर मध्ये उल्लेख असून त्याच्या ५० टक्के कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव असून हा निर्णय विभागीय आयुक्त घेणार आहेत. राजगुरुनगर नगर परिषदेत सध्या २०० पेक्षा जास्त कर्मचारी असून त्याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे.

याबाबत नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे म्हणाले कि, शासनाने आकृती बंध मंजूर केल्याने ३९ कायमस्वरूपी पदांना मान्यता मिळाली आहे. राज्य शासनाकडून राज्यस्तरीय संवर्गातील ११ महत्वाची पदे येत्या १५ दिवसांत भरण्यात येणार असल्याने शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. विकास कामांना गती मिळेल, पाणी आरोग्य स्वच्छता याबाबत तत्काळ निर्णय मार्गी लागतील कर निर्धारणा वेळेत होवून नगर परिषदेचा महसूल वाढेल. लेखापाल आल्यानंतर अनेक प्रलंबित देणी देण्याच्या अडचणी दूर होतील.

Last modified on Friday, 29 September 2017 16:05