2019 च्या निवडणूकांपूर्वी आणीबाणी जाहीर होईल

By September 29, 2017 0
  • रामदास फुटाणे: सांस्कृतिक कट्ट्यावर दिलखुलास बातचीत

khedtimes.today |
पुणे : समाजमाध्यमांवर व्यक्‍त झाल्यानंतर आता पत्रकारांना नोटीसा पाठविल्या आहेत. मात्र या नोटीसा ही आणीबाणीची मुळं आहेत, 2019 च्या निवडणूकीपुर्वी देशात आणीबाणी जाहीर होईल असे मत ज्येष्ठ वात्रटीकाकार कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्‍त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, कॉग्रेंसने आणीबाणीच्या काळात लोकांना 18 वर्षे जेलमध्ये पाठवलं हे सरकार तर 36 वर्ष पाठवेल. पत्रकारांना अशा प्रकारे पाठविल्या जाणाऱ्या नोटीसांचा निषेधच आहे. आज मी जेव्हा ग्रामीण भागात जातो तेव्हा मी पहातो तिथली तरुण मुलं ज्या प्रकारची भाषा बोलतात, त्यांच्यामध्ये जो जातीयवाद आहे तो जर तसाच राहिला तर भविष्य भयानक असणार आहे.

आपल्याकडचा प्रत्येकच राजकारणी अर्थव्यवस्थेबाबत न बोलता जातीयतेबद्दल बोलतो आहे. भारत देश हा मुळात भाविक आणि भावूक देश आहे. जोपर्यंत अंधश्रध्दा घराघरातून जात नाही, जोपर्यंत माणूस तर्काने विचार करत नाही तोपर्यंत ही जातीव्यवस्था जाणार नाही. ही जाण्यासाठी अजून दोनशे ते तीनशे वर्ष लागतील. इंग्रजी आणि सध्याच्या एकूणच भाषेबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, फ्रान्स हा देश एकेकाळी परदेशी भाषेच्या विरोधात होता, परंतु कालांतराने त्याला बदलावे लागले. आज फ्रान्समध्येही इंग्रजी भाषा आली आहे आणि जगाच्या स्पर्धेत टिकाण्यासाठी इंग्रजी गरजेची आहे.

प्रकाश आंबेडकर यांनीच फक्त शाळेच्या दाखल्यावरील जात काढावी अशी मागणी केली होती. हे धाडस कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही. जो तो जातीच्या भिंती घट्ट करून त्याचा फायदा उठवतात. राज्यकर्ते घाशीराम कोतवाल पाळतात, आणि कार्यकर्त्यांचा बळी घेतात. सध्या राजकारण हे जगण्याचे साधन मानले जात आहे. मंडल आयोगानंतर सर्व जाती बळकट होत आहेत. गेली तीस वर्षात विविध जातींच्या नेत्यांना सांभाळण्यात आणि गोंजारण्यात गेली आहेत. जात जाण्यापेक्षा ती आणखी घट्ट होत आहे.

  • कवितेच्या क्षेत्रात मला चुकून आर्थिक फायदा झाला

नोकऱ्यांबाबत बोलताना ते म्हणाले, मी कोणत्याही एकाच नोकरीवर किंवा कामावर अवलंबून राहिलो नाही. मी अनेक गोष्टी केल्या. जाहिरातीचे होर्डिंग केले, सिनेमा काढला, कवितेच्या क्षेत्रात आलो. कवितेच्या क्षेत्रात मला चुकून आर्थिक फायदा झाला. कोण काय म्हणते हे न पहाता लिहित गेलो. काहीत यशही मिळाले काही गोष्टींमध्ये अपयशीही ठरलो. एक रुपयाही खर्च न करता मी आमदारही झालो असल्याचे फुटाणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच्या काही आठवणीही सांगितल्या. तसेच सध्याच्या परिस्थितीवर भाष्य कणारी “कटपिस’ ही हिंदी कविताही सादर केली.

  • तरीही 90 टक्‍के मराठा मुलांना नोकऱ्या मिळणार नाही

सध्याच्या अर्थव्यवस्थेवर तसेच एकूणच परिस्थितीवर बोलताना फुटाणे म्हणाले, मराठा मोर्चानंतर त्यांना 10 टक्‍के जरी आरक्षण मिळाले तरीही 90 टक्‍के मुलांना नोकरी मिळणार नाही कारण सध्याची परिस्थितीच नाही. जात हा आपल्यासमोरील प्रश्‍न नसून अर्थकारण हा आपल्यासमोरील महत्त्वाचा प्रश्‍न आहे ज्याच्यापासून सर्वच राजकारणी दूर पळत आहेत. आज कितीतरी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरियाचे युध्द झाले तर दोन ते तीन लाख जणांना नोकऱ्या गमवाव्या लागतील.

Last modified on Friday, 29 September 2017 15:20