कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !

डिजिटल आणि हेल्पलाईन सेवेचा मानस

khedtimes.today |

कुरूळी गावचे बधाले घराण्याने गेली कित्येक वर्षे गावच्या आणि तालुक्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला. ४० वर्षांहून अधिक काळ या घराण्याला राजकीय वारसा लाभला आहे. विकासाच्या मुद्द्यावर गावात एकोपा निर्माण केला. त्यामुळे विरोधाची धार कधी दिसलीच नाही. वाडवडिलांच्या सामाजिक आणि राजकीय आदर्श डोळ्यासमोर ठेवून बधाले कुटुंबियांना पुन्हा गावाचे ‘कारभारी पद’ खुशीत मिळाले. त्यामुळे गावच्या राजकारणात १७ वर्षांपूर्वीच्या इतिहास पुन्हा रचला गेला. कुरूळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत बाळासाहेब बधाले यांची बिनविरोध निवड झाली. या निमित्ताने गाव विकासाचा वेध घेत बधाले घराण्याचा राजकीय प्रवास ‘खेड टाइम्स’ने उलगडला आहे.

प्रश्न : सरपंचपदाच्या निवडीचे श्रेय कोणाला द्याल ?
चंद्रकांत बधाले : वडील बाळासाहेब दगडूजी बधाले यांना व गावच्या जनतेला देता येईल.

प्रश्न : राजकीय वारसा व आपली स्वत: ची राजकीय वाटचाल याबद्दल काय सांगाल ?
: माझे आजोबा कै. दगडूजी गणपत बधाले यांच्यापासून बधाले घराण्याचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते जुन्या १७ गावे मिळून असणा-या कुरूळी गावच्या विकास सोसायटीचे चेअरमन होते. त्यानंतर वडील बाळासाहेब बधाले हे समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात आले. १९९० मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य, तर १९९५ साली कुरूळी गावच्या इतिहासात पहिल्यांदा सरपंचदी बिनविरोध म्हणून विराजमान झाले. यानंतर मी बी. कॉम व ‘डिप्लोमा इन अकाऊंटिंग’चे शिक्षण पूर्ण केले. आता वडिलांचा इतिहास १७ वर्षांनंतर पुन्हा घडवण्यात यश आले, यासाठी स्वत:ला भाग्यशाली समजतो.

प्रश्न : आगामी राजकीय वाटचाल कशी असेल?
: गावच्या राजकारणातील सर्वोच्चपद मिळाले आहेत, त्यामुळे आता तालुक्यात सक्रिय होण्याची अपार इच्छा आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहे.

प्रश्न : कुरूळीतील बधाले घराण्याची माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक अशी ओळख आहे. त्याबद्दल काय सांगाल ?
: हो, नक्कीच. बधाले घराण्याची अशी ओळख आहे. आम्ही राष्ट्रवादी व अण्णा (दिलीप मोहिते) यांच्याशीच एकनिष्ठ आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात देखील आम्ही अण्णांसोबत असू.

प्रश्न : गावपुढा-याला विरोध हे आता नवीन राहिले नाही, तरीही तुम्ही बिनविरोध बाजी मारली, ही किमया कशी साधली ?
: गावातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाच्या सुख - दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. याचमुळे गाव कायम आम्हाला साथ व प्रोत्साहन देते. ही किमया त्यामुळे साधणे शक्य झाले आहे. तसेच सुदाम मु-हे, शांताराम सोनवणे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

प्रश्न : औद्योगिकीरणामुळे परप्रांतीयांचा लोंढा येतो, त्यामुळे गावच्या पायाभूत सुविधांवर ताण पडतो, या सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान कसे पेलणार आहात ?
: औद्योगिकीकरणामुळे गावचा विकास होत आहे, मात्र त्याचे दुष्परिणामही जाणवतात. मात्र बाहेरील नागरिकांच्या लोंढ्यामुळे निश्चित गावच्या सुविधांवर ताण येतो. `गाववाले' आणि `बाहेरचे' असा भेदभाव न करता गावात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक नागरिकाला सुविधा पुरविणे, हे मी माझे कर्तव्य मानणार आहे. गावची लोकसंख्या आता ५० हजार झाली आहे. कुरूळी ग्रामपंचायतीला `एमआयडीसी'कडून २४ एकर जागा मिळणार आहे. या ठिकाणी १० गुंठ्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी १० लाख लीटर क्षमतेची टाकी बांधणार आहोत. तसेच याच ठिकाणी आता आपण भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधण्याचा मानस असून, उर्वरित पाच एकरमध्ये उद्यान उभारणार आहोत.

प्रश्न : गावचे `प्रथम नागरीक' या नात्याने गावच्या विकासाच्या संदर्भात तुमचा अजेंडा काय असेल ?
: सध्या गावातील रस्ते चांगले असून, ते वाड्या वस्त्यांपर्यंत पोहचणार आहे. गावात आरोग्य उपकेंद्र आणणार, गावात सौर उर्जेचा वापर वाढविण्यावर भर देणार आहे. गाव संपूर्ण `डिजीटल' करणार आहे. स्मशानभूमीचे उर्वरित काम पूर्ण करू. विशेष म्हणजे महिन्याभरात आत्पकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी कुरूळी गावची स्वतंत्र `हेल्पलाईन सेवा' सुरू करत आहोत. एक निर्मल, आदर्श गाव निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे.

- शुभम वाळुंज, राजगुरूनगर.

Rate this item
(0 votes)
Last modified on Thursday, 28 September 2017 20:09