वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !

विनोद उर्फ पप्पु टोपे विनोद उर्फ पप्पु टोपे

khedtimes.today |

गेली कित्येक वर्षे खुर्चीला चिटकून बसलेल्या गावातील बुर्जुंगांना विकासाच्या मुद्द्यावर शह देण्याची किमया साधली आणि अल्पावधित गावापासून तालुका पातळीवर नानात-हेचे डावपेच टाकत खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर ज्या युवा चेह-यांकडे पाहिले जाते त्यामध्ये विनोद उर्फ पप्पु टोपे यांचे नाव निश्चितच पुढच्या रांगेत दिसते. वयाच्या अवघ्या २० वर्षी स्वत:ला गावच्या राजकारणात झोकून देत विकासाचा झेंडा खांद्यावर घेत राजकीय प्रवासाची ‘घटस्थापना’ केली होती. मागील आठ-दहा वर्षांत गावपासून ते तालुका पातळीवरील अनेक निवडणुकांमध्ये यश-अपयशाचे खढउतार पचविले. सध्या भारतीय जनता पक्षाचा तालुक्यातील एक युवा चेहरा म्हणून विनोद टोपे यांच्याकडे पाहिले जाते. वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या चुरशीची लढतीमध्ये विनोद टोपे यांनी बाजी मारली. गावच्या विकासाचा अजेंडा, आजपर्यतचा राजकीय प्रवास, वेगवेगळ्या निवडणुकांमधील चढउतार या प्रश्नांचा उलगडा ‘खेड टाइम्स’ने केला आहे. नवनिर्वाचित सरपंच विनोद टोपे यांच्याशी केलेली खास बातचीत...


प्रश्न : आपली ही सरपंच पदी निवड झाली यांचे श्रेय कोणाला द्याल?
विनोद टोपे : ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची कृपा व तसेच आई वडिलांचे आशीर्वाद होते. म्हणून शक्य झाले आहे.

प्रश्न : राजकीय वाटचाल कधी व कशाप्रकारे सुरू झाली?
: माझा राजकीय प्रवास हा २००८ साली सुरू झाला. पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती; परंतु दुर्दैवाने त्यावेळी अवघ्या वीस मतांनी पराभवाचा सामना झाला. पण तरीही या अपयशामुळे न खचता पुन्हा उभारी घेतली. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून संघटनाचे काम करताना तालुक्याचे युवा मोर्चाचे प्रमुखपद मिळाले. यातूनच भाजपाच्या तालुक्यात ५७ शाखा सुरू केल्या आहे. यात संदीप सोमवंशी याचे अनमोल मार्गदर्शन मला लाभले आहे. आता झालेल्या बाजार समिती लढवण्याचा निर्णय घेतला, परंतु यामध्ये ही सात मतांनी पराभव झाला. गावच्या राजकरणात घरचे कुणीच नसल्याने काहीजण कुरघोड्या करण्याचे काम करत होते; परंतु भैरवनाथ महाराजांच्या आर्शीवादामुळे चार वर्ष उपसरपंच आणि आता सरपंच झालो आहे.

प्रश्न : आगामी राजकीय वाटचाल कशी असेल?
: गावच्या राजकरणातील सर्वोच्च पद, जबाबदारी मिळाली आहे. चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण एकदा सरपंच झाल्यावर इतरांसारखे येथेच चिकटून राहणे मला पटत नाही. त्यामुळे माझा पॅनल गावात निवडणूक लढवीन. मी भाजपाच्या माध्यमातून पुर्ण वेळ तालुक्यात सक्रीय होणार आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद या दिशेने माझी आगेकूच नक्कीच असेल आणि ती तुम्हाला पाहयला देखील मिळेल.

प्रश्न : गावात तुम्हाला राजकीय विरोधक आहेत. मग गावच्या विकासाच्या संदर्भात सुवर्णमध्य कसा साधाल?
: विरोधकांची भूमिका ही विरोधाला विरोध एवढीच राहिल्याने ती नेहमीच पोकळ ठरते. गावात मला विरोधकच उरलेच नाहीत. असेलच तर बोटावर मोजण्याइतपत. गावाचा संपूर्ण पाठींबा मला आहे. त्यामुळे गावचा विकास कुणीच थांबवू शकत नाही.

प्रश्न : आजपर्यतच्या निवडणुकांमध्ये अनेक चढउतार आले. त्याबद्दल काय सांगाल?  
: माझे राजकीय गुरू म्हणालं, तर मला या क्षेत्रात ज्यांनी खूप काही दिलं व देत आहेत, असे संदीप सोमवंशी हे प्रमुखपदावर आहेत. तसेच या पडझडीच्या काळात बळवंत टोपे, नाना टोपे, अकुंश गारगोटे, भाऊसाहेब टोपे, संतोष गारगोटे, ॲड. विकास जाधव, विश्वास टोपे, सुनिल टोपे, दत्तात्रय कड, गंगाराम टोपे यांची आजपर्यत बहूमुल्य साथ लाभली.

प्रश्न : वाकी गावच्या विकासासंदर्भात तुमचा अजेंठा काय असेल?
: गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिराचे तसेच सभामंडपाचे काम चालू आहे. ते पूर्ण करून घेणार. संपूर्ण गावासाठी पाणी योजना राबवणार, सर्व वस्त्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत डांबरीकरण करणे, जलसंधारणाची कामे देखील हाती घेण्याच्या मानस आहे.

प्रश्न : तालुक्यात पक्ष संघटन करण्यासाठी कोणती रणनीती राबवणार?
: तालुक्यातील बरेचसे सरपंच, उपसरपंच यांच्याशी माझे व्यक्तीगत जिव्हाळाचे संबंध आहेत. त्यातील काही भाजपात येण्यास इच्छुक आहे. त्यांच्यामार्फत भाजपाचे संघठन वाढवणे. गावागावांतील माझा जनसंपर्क दांडगा आहे, त्याचा वापर करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.

मुलाखत व शब्दांकन : शुभम वाळुंज, राजगुरूनगर

Rate this item
(1 Vote)
Last modified on Monday, 18 September 2017 17:22