गावगाडा भाग ५

By October 08, 2017 0

khedtimes.today |
सुगीचा हंगाम संपत आला. खळ्याभोवती सांडलेले, वावडीवरून उधळलेलं मातरं गोळ्या झालं. गडी माणसं थोडी निवांत झाली, परंतु बाया-बापड्यांना अजून उसंत नव्हती. नदीवर खळाळत्या पाण्यात, डोहात मातरं धुवायचं काम चालू झालं, अनेक प्रकारचं धान्य मातीत एकत्र झालेलं, दुरडीत भरून ते पाण्यात खंगाळलं की काळी माती पाण्यात विरघळून जायची, लहानसहान खडे मात्र तसेच राहयचे, चवाळ, बारदानावर ते वाळत घालायचे. दिवसभर बाया नदीत मातरं धुवायच्या. लहान-सान पोरं पोरी नदीत डुंबायची. नदीचा प्रवाह गळासारखा वहायचा. बुडकीचा डोह, हजरत बाबाचा डोह, म्हसुबाचा डोह, खटकळी या सा-या डोहावर मातरं धुवायची घाई चाललेली असायची. उन्हाचा पारा लागला की म्हशी डोहात घुसायच्या, जनावरं मात-याला तोंड लावायची, कुत्र्यांच्या कळवडीनं वाळत घातलेलं मातरं विस्कटलं की बाया शिव्या हासाडायच्या, राखोळ्याच्या कुळीचा उद्धार करून मोकळ्या व्हायच्या.

उन्हाचा कडाका जस जसा तापायचा तस तसं मातरं वाळायचं, वा-याची झुळूक मंद व्हायची, झाडाझुडपाची सळ-सळ थांबायची, पाण्यात असून अंगाला घाम फुटायचा. पाखरं शांत झालेली, भर उन्हात मात्र घार आकाशात झेप घेत होती. एखाद दुसरी टिटवी पण मध्येच टिवटिवत उडायची. नदीच्या डोहाच्या कडेला बगळे एका पायावर तासन्-तास उभी ठाकलेली होती, अलगद एखाद मासा पटकन गिळायची. दिस कलताच उन्हं उतरणीला लागताच मात-याची गाठोडे बांधून बाया गाववाटाला लागयच्या.

भल्या पहाटे महारवाड्यात हलगी कडाडू लागली. तस-तस गाव जागा होत होता. हलगीचा आवाज घुमू लागला अन आळीचे कान टवकारले. आवसगावची पोतराज मंडळी गावात दाखलं झालेली. रातीच वस्तीला किसनाच्या घरी महारवाड्यात उतरलेले. परसु पोतराज अन सोबती सोनबा होताच, अंगोळ आटोपून सोनबानं आपल्या साहित्याचं गोठोडे सोडलं अन त्यातलं एक साहित्य बाहेर काढून व्यवस्थितपणे मांडणी केली. तोपर्यत किसनाच्या बायकोनं रखमानं चुल पेटवली अन् चहा टाकला. दोन जरमलाच्या परातीत चहा दिला, रखमाला त्यांनी चहा घेऊन परती हवाली केल्या. गाठोड्यातून, डब्यातल्या वस्तूमधून हळद, कुंकू, तेलाची बाटली, फणी, आरसा, गंध असं समोर मांडून प्रथम केसाला तेल लावलं, फणीनं विचरून केस मोकळे सोडलं. कपाळवर पिवळं पट्ट काढून त्यावर हळदी कुंकवाचा मळवट भरला. अंगात सदरा घालून बाह्या कोपरापर्यत धूमडून घेतल्या. कमरेला एक-एक चोळाचा खण, झंपर, पिसांचा घेर सुटसुटीत बांधून घेतला, यालाच ‘आभ्राण’ असे म्हणतात.

अधून मधून सोनबा हलगी पेटलेल्या चुलीपुढं धरून शेकत होता, जेणेकरून हलगीचा आवाज टंग..टंग वाजावा, हातातल्या टिप-याने तो पुन्हा पुन्हा टिपरू टाकून बघायचा. परसु साज चढवण्यात दंग होता. महारवाड्यात, मांगवाड्यात लक्ष्मी आई, मरीआईचं देवळं असायची. कुठे निवारा असायची तर कुठे उघडी बोडकी देवळे असायची. निवारा असलाच तर तो ही पत्रावजा एकांद लहानसं शेडवजा असायचे. गावातल्या विशेष करून म्हार-मांग वाडातल्या बायांच्या अंगात या देवी यायच्या व त्याच या मंदीराच्या ख-या पुजारी असतं. देवळाची देखभाल ही त्या समाजाची मक्तेदारीच असे. समाबाय, कलूबाय या गावातल्या नामांकित आराधीनी होत्या. मंगळवार, शुक्रवारी नित्यनेमानं ह्या दोघी शेणानं देवळं सारवायच्या.

दिस उगवून वर आला आन परसु साज चढवून तयार झाला. देवीचं दर्शन घेऊन हलगी कडाडली अन परसुनं ताल धरला. सोनबाचं टिपरू हालगीवर जोर धरू लागलं, गावातल्या आया-बाया मरीआयच्या देवळासमोर जमू लागल्या की, पोरं सोर गर्दी करू लागली. गळ्यात कवड्याच्या माळा, हिरव्या बांगड्यांची माळ, गळ्यात आसूडागत पोत या पोताचं टोक शेदरानं लाल केललं, नारळ्याच्या आकाराचं तर बाकी निमळूता आकार होता. ‘लक्ष्मी आयचं चांगभलं, मरीमातेचं चांगभलं’, अशी आरोळी ठोकून पुन्हा हलगी कडाडली अन परसुच्या पायांनी ताल धरला. पायातल्या घुंगरांचा मंजूळ आवाज हलगीच्या सुरात सुर मिसळाचा. केस मोकळे सोडून गोल फिरकी घेत फिरायचा. गाया-म्हातारी, गडी माणसांनी देवळाच्या समोर गर्दी केली तर काहींनी पाण्याचा तांब्या, सुपात दाणं, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, डाळ, दाणं सुपात आणून मांडलं. मात्र यात हळदी कुंकवाचा करंडा हमखास असायचा. बाया पोतराजाच्या पायावर पाणी घालायच्या, हळदी कुंकू लावून डोईवर पदर घेऊन मनोभावे दर्शन घ्यायच्या. पोतराजही बायामाणसांच्या कपाळाला हळदी कुंकू लाऊन ‘येल मांडवाला जाऊ दे, लक्ष्मी आय सुखात ठेव, असा आशिर्वाद द्यायचे.

सोनबानं हलगीचा आवाज वाढवला, आता गाण्याला सुरूवात होणार होती. रामायण, महाभारत, रामसितेचा वनवास, श्रावणबाळाची कहाणी, राजा दशरथानं केलेला श्रावणबाळाचा वध या सा-या कहाण्या परसू आपल्या गोड आवाजात पोतराजाच्या रचलेल्या गाण्यातून लोकांसमोर मांडायचा.
‘नगर, बिदर शेगाववाल्या,
जमल्या सा-या जणी.
आष्टी, पाटोदा, जामखेड, बीडच्या,
जमल्या - जमल्या सवासणी.’
गीताला सुरूवात व्हायची, बाया तल्लीन होऊन गाणी ऐकायच्या.
‘कैकयीच्या हट्टापायी
राजा राम झाला दास,
परटाच्या घुगलीने
सीता भोगी वनवास.’
बाया भान विसरून जायच्या, डोळ्याला पदर लावायच्या. दिस बराच वर आलेला असायचा, चार आठ दिसात गाव मागून व्हायचा. पोतावर पाजळायला दिलेलं तेल जमायचं, पैशाची चिल्लर खुळखुळायची, दुपारनंतर पोतराजाचा खेळ संपायचा. नाचून- नाचून हात-पाय ठसठसायचं, तिन्ही सांजला मरीआयच्या मंदीरात दिवा पेटायचा, राती कुणाच्या तरी घरी आराध्याच्या बैठका व्हायच्या, कोंबड्याच्या रस्याच्या पराती वरपून पोतराज मंडळी दोन चार दिसातला मुक्काम संपवून दुसरं गाव गाठायचे.

- प्रकाश बनसोडे, ९९२२६८५१४४

Last modified on Sunday, 08 October 2017 12:39